पासष्टाव्या घरातले पक्षाध्यक्ष!

    दिनांक :07-Jul-2019
मंथन  
 
भाऊ तोरसेकर 
 
 
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याला आता महिन्याचा काळ लोटला आहे. इतक्या दिवसात त्या पक्षाला आपला नवा अध्यक्ष निवडता आलेला नाही, किंवा राहुलनाच अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी पटवण्यातही श्रेष्ठी यशस्वी झालेले नाहीत. कारण सवाल, या पराभवाची जबाबदारी कुणाची असा नसून, येऊ घातलेल्या पराभवाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आहे. कॉंग्रेस पक्षातल्या प्रत्येक नेत्याची हीच गुणवत्ता असते, की त्यांना कुठलीही जबाबदारी नको असते. साहजिकच त्यांना असा अध्यक्ष किंवा नेता लागतो, जो जबाबदारी घेईल आणि तरीही तोच कर्तृत्ववान असल्याची इतरांनी ग्वाही द्यायची असते. परिणामी, राहुल भले राजीनामा देतील, पण तो स्वीकारायचा कुणी, असा घटनात्मक प्रश्न पक्षासमोर उभा आहे. जर पक्षाने त्यांना अध्यक्षपदी निवडलेलेच नसेल, तर पक्षाला राजीनामा तरी स्वीकारण्याचा अधिकार कसा असेल? 2013 च्या अखेरीस राहुल पक्षाचे उपाध्यक्ष झालेले होते. पण, त्यापूर्वी कधी पक्षात असे पद उपलब्ध नव्हते, की कुणी उपाध्यक्षही झालेला नव्हता. मग अचानक आता हे पद आले कुठून वा राहुलना ते मिळालेच कसे? कुणी असा प्रश्न विचारण्याची हिंमत तरी केलेली होती काय? अकस्मात एके दिवशी, दोन दशकांपूर्वी सोनिया पक्षाध्यक्ष झाल्या, तेव्हातरी त्यांना कुणी त्या पदावर आणून बसवले होते? आणि त्याचा आधार काय होता? असे प्रश्न तेव्हा विचारले गेले नसतील, तर आता कोण विचारणार? पण आज ज्या परिस्थितीत कॉंग्रेस पक्ष आहे, त्याला त्यापासून मोक्ष देण्याची कुवत असलेले अनेक जण सध्या कॉंग्रेस गोतावळ्यात आहेत. पण, त्याकडे कुणाचेच लक्ष जात नसेल, तर सगळेच बुचकळ्यात पडण्यालाही पर्याय नाही ना? कुमार केतकर पक्षाचे खासदार आहेत आणि सुधींद्र कुलकर्णी राहुलचे सल्लागार असल्याचे कुणा कॉंग्रेस नेत्यांना कशाला आठवत नाही? इतके कर्तबगार अध्यक्ष कॉंग्रेसला शोधूनही मिळणार नाहीत ना?
 
 
 
कुठल्याही राजकीय पक्ष वा संघटनेला मोक्ष हवा असेल, तर तिने शांतपणे ग्रंथप्रामाण्यवादी पुस्तकपंडितांना शरण जायचे असते. कारण पुस्तकपंडितांना व्यवहाराशी कधी कर्तव्य नसते. त्यात केतकर किंवा त्यांच्यासारखे कॉंग्रेसवादी बुद्धिमंत खूप उच्च पातळीवर आहेत. पण, राहुलच्या जागी पर्यायी अध्यक्ष शोधताना कुणाचेच लक्ष तिकडे गेलेले दिसत नाही. सुशीलकुमार शिंदे किंवा अशोक गहलोत अशा नावांची उगाच चर्चा चाललेली आहे. त्यांच्याकडून काय साध्य होऊ शकते? ते पक्षाला पराभवापासून वाचवू शकत नाहीत किंवा नव्याने ऊर्जितावस्थेलाही आणू शकत नाहीत. अशा वेळी बुडणार्‍या पक्षालाही तो प्रगतिपथावर असल्याचाच खोटा दिलासा देणार्‍यांची गरज असते. लोकसभेतील पराभवानंतर सुधींद्र कुलकर्णी यांनी, ‘नॅशनल हेराल्ड’ या कॉंग्रेसच्या अधिकृत दैनिकात राहुल गांधींच्या नैतिक विजयाची ग्वाही दिलेली होती ना? जगातला इतर कुणी शहाणा वा राजकीय अभ्यासक त्या व्यवहारी पराभवातला विजय सिद्ध करू शकला होता काय? पण, ती किमया कुलकर्णी यांनी दाखवली आहे आणि अशा जादूचीच सध्या कॉंग्रेसला गरज आहे. तिथे व्यवहारी निवडणुका लढलेले वा मुख्यमंत्री म्हणून कारभार हाकलेले िंशदे-गहलोत काय दिवे लावू शकणार आहेत? त्यापेक्षा कुमार केतकर आणि सुधींद्र कुलकर्णी कॉंग्रेसला सुखनैव मूठमाती देण्याचे काम करू शकतील. आपण संपलो कधी आणि कसे, याचा थांगपत्ता कुठल्याही राज्यातल्या कॉंग्रेस नेत्यांना वा पक्षालाही लागणार नाही. दुर्दैव इतकेच, की अजून अशा कर्तबगार दोघांचे नावही कुठे चर्चेत आलेले नाही. की राहुल गांधींपर्यंत त्या दोघांना कुणी जाऊच देत नसावा का? अन्यथा फतवा काढूनच राहुलनी या दोघांना अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नेमून टाकले असते. मग मोदींची भीती कुणाला बाळगण्याचे कारण उरले नसते. कारण मोदी कसे संपणार, याचे पंचाग केतकरांनी खूप पूर्वीच एबीपी माझा वाहिनीच्या कट्‌ट्यावर बसून मांडलेले आहे.
 
मला याचीच गंमत वाटते, की केतकर राहुलना सल्ला देतात आणि त्यांचा सल्ला नरेंद्र मोदी काळजीपूर्वक उपयोगात आणतात. याकडे तरी कुणा कॉंग्रेसवाल्याने थोडे गंभीर होऊन बघायला नको काय? मध्यंतरी केतकरांनी हमीच दिलेली होती, की मोदींचा सतराव्या लोकसभेत दारुण पराभव होणार आहे आणि त्यातून त्यांना, अयोध्येचा श्रीराम अवतरला तरीही वाचवू शकणार नाही. हा इशारा केतकरांनी मोदींना किंवा भाजपाला दिलेला नव्हता. तो कॉंग्रेस व राहुलना दिलेला होता. त्याचा अर्थ असा होता, की मोदींनी अयोध्येतील रामाच्या मंदिराच्या उभारणीत फसावे आणि त्यांचा राजकीय निवडणुकीत पराभव व्हावा. सापळा खूप छान व सोपा होता. पण, कपिल सिब्बल किंवा अन्य कॉंग्रेसवाल्यांनी केतकरांना तो सापळा लावूच दिला नाही. मोदींच्या पहिल्या कारकीर्दीत मंदिराच्या कामात जितके अडथळे आणता येतील, तितके आणले आणि मोदी त्यापासून अलगद दूर राहिले. परिणाम असा झाला, की मोदींनी अध्यादेश काढला नाही किंवा संघाच्या कुठल्या संस्थेला मंदिराची उभारणी करण्यास मुभा दिली नाही. सुप्रीम कोर्टात सिब्बलांनी अडथळे आणले नसते, तर मंदिराचा मार्ग मोकळा झाला असता आणि मोदींचे सरकार व भाजपा मंदिरातच फसत गेली असती. त्यांनी पुलवामा, बालाकोट किंवा गरिबांना गॅसजोडणी वा वीजपुरवठ्याच्या गोष्टीच केल्या नसत्या. त्यापेक्षा मंदिराच्या उभारणीसाठी छाती फ़ुगवून मोदी प्रचारात मिरवले असते. अयोध्येतला राम आपल्याला निवडणुका जिंकून देईल, अशा भ्रमात मोदी राहिले असते, तर राहुलना 72 हजार रुपयांत निवडणूक सहज जिंकता आली असती. पण, केतकरांचा इशारा मोदींनी गंभीरपणे घेतला. रामाच्या मंदिरापेक्षाही पुलवामा-बालाकोटवर भर दिला आणि पुन्हा एकदा लोकसभा जिंकली. रामाची मदत घेण्यापेक्षा त्यांनी केलेल्या कामाच्या बळावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याचे श्रेय केतकरांचे नाही, तर काय अमित शाहंचे आहे?
 
आताही इतके मोठे बहुमत मिळवल्याने नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार कसे मस्तवाल होऊन गाळात जाणार आहे, त्याचे पंचांग केतकरांनी ‘द प्रिंट’ नावाच्या संकेतस्थळावर प्रदीर्घ लेखातून मांडलेले आहे. म्हणजेच अशा वेळी मोदी सरकारला कुठलाही प्रतिकार करण्यापेक्षा मस्तवाल होऊ देणे, असा सापळा केतकरांनी सुचवलेला आहे. पण, तिकडे पुन्हा कुणाही कॉंग्रेसवाल्याचे लक्ष नाही. सगळे मूर्ख लेकाचे राहुलची समजूत घालून अध्यक्षपदी कायम राखण्यात गर्क आहेत. विधानसभा लढवण्याचे मनसुबे रचण्यात रमलेले आहेत. पण, मोदींना केतकरी सापळ्यात अडकवण्याचा विचारही कुणा कॉंग्रेसवाल्याच्या मनाला शिवलेला नाही. दुसरे सुधींद्र कुलकर्णी. त्यांना नैतिक विजयानेही सत्ता मिळवण्याची किमया साधलेली आहे. राहुलना पक्ष संभाळता येत नसेल आणि निवडणुका जिंकून सत्ता मिळवणे शक्य नसेल, तर निवडणुकांशिवायच सत्ता मिळवण्याला कॉंग्रेसने प्राधान्य देणे भाग आहे ना? मग ती किमया ज्याला साधली आहे, त्याचाच सल्ला बहुमोलाचा नाही काय? त्यात फक्त कुलकर्ण्यांचाच हातखंडा आहे. त्यामुळे जुन्यापान्या कुणा नेत्यांना कॉंग्रेसची सूत्रे सोपवण्यापेक्षाही केतकरांना पक्षाध्यक्ष करावे आणि कुलकर्णींना महासचिवपदी नेमले, तर किती बहार येईल ना? हुड्‌डा किंवा अशोक चव्हाणांना बाजूला ठेवूनही हरयाणा व महाराष्ट्रात कॉंग्रेसला नैतिक विजय संपादन करता येतील. कार्यकारिणी वा श्रेष्ठी असल्या सर्व दगदगीतून राहुलना कायमची मुक्ती मिळून जाईल. मराठीत आपण म्हणतो ना ‘काखेत कळसा नि गावाला वळसा!’ घरात नि दारात केतकर-कुलकर्णी असताना कॉंग्रेस इतरत्र अध्यक्ष कशाला शोधते आहे? कुठल्या तंत्रज्ञ वा रणनीतिकाराची कॉंग्रेसला गरजच काय? या दोघांना बुद्धिबळाचा पट आणून द्यावा आणि त्याच्या पासष्टाव्या घरात त्या दोघांना बसवावे. काम झालेच म्हणून समजा. त्यासाठी पासष्ट घरे असलेला बुद्धिबळाचा पट कुठून आणायचा, ते कुमार केतकर सांगू शकतील. त्यांनी त्यावर यापूर्वी दोनदा अग्रलेखरूपी प्रबंध लिहिलेले आहेतच.