ब्रिटिशकालीन २२० धरणं धोकादायक अवस्थेत?

    दिनांक :07-Jul-2019
नागपूर: राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. याच मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण फुटून वाहून गेलेल्यांपैकी 19 मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. सरकारने देखील आता चौकशीचे आदेश देत जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तिवरे दुर्घटनेनंतर आता राज्यातील धरणांच्या स्थितीवर चर्चा सुरू झाली आहे. चिपळूणमधील तिवरे धरणं फुटलं आणि 19 जणांचा जीव गेला. त्यानंतर आता देशातील धरणांच्या स्थितीबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. देशात इंग्रजांच्या काळातील 220 धरणं असून त्यांना 100 वर्षे लोटली आहेत. त्यामुळे त्यांची दुरूस्ती आणि त्याकडे लक्ष न दिल्यास मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागू शकतो अशी शक्यता आहे. South Asia Network On Dams Rivers and people ( SANDRP )चे को-ऑर्डिनेटर हिमांशू ठक्कर यांच्या मते सर्व धरणं धोकादायक स्थितीत आहेत असे नाही. पण, त्यांची देखभाल न केल्यास मोठा धोका भविष्यात निर्माण होऊ शकतो असा सूचक इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी तिवरे धरणाचं उदाहरण दिलं. कारण, 2004 मध्ये या धरणाचे बांधकाम करण्यात आले होते. 
राज्यामधील धरणांची आकडेवारी बघितल्यास मध्य प्रदेशात 59, महाराष्ट्रात 41, गुजरातमध्ये 30, राजस्थानमध्ये 25, उत्तर प्रदेश आणि तेलंगनामध्ये प्रत्येकी 17, कर्नाटकमध्ये 15, छत्तीसगडमध्ये 6, आंध्र प्रदेशमध्ये 4, ओडिसामध्ये 3 आणि बिहार, केरळ, तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक- एक धरण आहे.