वणीत चौदा किलो गांजा जप्त

    दिनांक :07-Jul-2019
यवतमाळ येथील युवकाला अटक,एक फरार
वणी: यवतमाळ येथून एका चार चाकी वाहनातून वणी शहरात गांजा येत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळच्या पथकाला मिळाली होती. त्यांनी वणी पोलिसांच्या मदतीने दि. 6 जुलैला सायंकाळी पट्टाचारा नगर जवळ दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करून एकाला अटक केली आहे. यातील एक आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला आहे.
वणी शहरात ठीक ठिकाणी शालेय विद्यार्थी सिगारेटचे झुरके मारताना दिसून येत आहेत. शहरा भोवताली असलेल्या निर्जन स्थळी किशोरवयीन व तरुणांची गांजा पिण्यासाठी मैफील जमते. शालेय विद्यार्थी या व्यसनाच्या विळख्यात ओढल्या जात आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेशातुन गांजाची तस्करी होत असल्याचे उघड झाले होते. शास्त्रीनगर येथील किराणा दुकानातून पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी गांजा जप्त केला होता. गांजा तस्कर छोट्या छोट्या कागदी पुड्या बांधून युवकांना पुरवत असल्याने विद्यार्थी या व्यसनाच्या आहारी गेले आहेत.
 
यवतमाळ येथून स्वीफ्ट कार क्रं. एम.एच. 29 ए. आर. 3205 या वाहनाने वणी शहरात गांजा आणल्या जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी या बाबत वणी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार दिलीप वडगावकर यांना दिली. त्यावरून पोउनि विजयमाला रिठे, पोउनि अशोक काकडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे व यवतमाळ पथकाचे सैय्यद साजिद व इतर पोलिसांनी मिळून वरोरा मार्गावर असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरातील पट्टाचारा नगर मध्ये सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास सापळा रचुन पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट कार त्या मार्गावर थांबली त्यातून विक्की कैलास धुळे वय 21 रा यवतमाळ, हा ब्याग घेऊन उतरला पोलिसांनी त्याला अटक केली. परंतु वाहन चालवत असलेला शैलेश राठोड रा. यवतमाळ हा कार घेऊन वरोराच्या दिशेने सुसाट वेगाने वाहन चालून फरार झाला आहे. पोलिसांनी ब्यागची तपासणी केली असता सात पाकिट मध्ये एक लाख 45 हजार 400 रुपये किमतीचा 14 किलो 540 ग्राम गांजा जप्त केला आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.