तलाठ्याने क्रीडांगण खोदल्याने खेळाडूंमध्ये प्रचंड संताप

    दिनांक :07-Jul-2019
मोहाडी: येथील एकमेव असलेल्या चंदूबाबा क्रीडांगणावर आपला हक्क सांगून तलाठी पदावर असलेल्या व्यक्तीने ट्रॅक्टर लाऊन खोदल्याने शहरातील खेळाडूंमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. खेळाडूंचे भविष्य उध्वस्त करणा-या तलाठ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील खेळाडू व नागरिकांनी केली आहे.
 
 
 
मोहाडी येथे अंदाजे 12 एकर शासकीय जागा असून त्यापैकी काही जागेवर मुलांना खेळण्याकरिता अस्थाई क्रीडांगण म्हणून पन्नास वर्षापासून वापर होत आहे. शासकीय दस्ताऐवजावर या जागेची गुरेचराई व झुडपी जंगल म्हणून नोंद आहे. मात्र मोहाडी येथीलच एका तलाठ्याने सदर जागेवर आपला हक्क सांगून प्रकरण न्यायालयात नेले. शासकीय अधिका-यांनी न्यायालयात शासनाची बाजू भक्कमपणे न मांडता व योग्य कागदपत्र सादर न केल्याने जागेचा निकाल तलाठ्याच्या बाजूने लागला. यावर शहरवासीयांनी आक्षेप घेतल्यानंतर शासनाने पुन्हा प्रकरण न्यायालयात फेर तपासणीसाठी दाखल केले असून सध्या ते न्यायप्रविष्ठ आहे.
मात्र शनिवारी सदर तलाठ्याने क्रीडांगणावर ट्रॅक्टर चालवून नांगरणी केली. यामुळे संपूर्ण मैदान खराब झाल्याने खेळाडूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही शासकीय जागा खेळाडूंकरिता वापरात यावी म्हणून संपूर्ण शहरवाशी एकवटले असून रविवारी सभा घेऊन स्टेडियम बचाव आंदोलन समितीची स्थापना करण्यात आली. सोमवार 8 जुलै रोजी समितीतर्फे तहसिलदारांना निवेदन देऊन मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.