पुरंदावडेत पार पडला पहिला गोल रिंगण सोहळा

    दिनांक :07-Jul-2019
सोलापूर- माऊलींच्या अश्वांनी घातलेले रिंगण, टाळ-मृदंगाचा गजर अन् माऊलींच्या जयघोषातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा पुरंदावडे भागातील सदाशिवनगर येथे पार पडला. हा सुखसोहळा लक्षावधी नेत्रांनी अनुभवला.

रिंगण सोहळ्यानंतर माऊली आणि विठ्ठलाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या साथीने दिंडीकऱ्यांचा उडीचा खेळ चांगलाच रंगला अन् सजलाही. वारीतील शीणभाग विसरून दिंडीकरी या खेळात तल्लीन झाले होते. गोल रिंगणचे मैदान गर्दीने फुलून गेले होते. गोलाकार पद्धतीने बसून भाविकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला. रिंगण सोहळ्यानंतर हा सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचेल.