शशी थरूर म्हणाले 'भगवा' रंग गौरवशाली

    दिनांक :07-Jul-2019
चेन्नई,
तिरुवनंतपुरम येथून काँग्रेसचे लोकसभेतील खासदार शशी थरूर यांनी भारतीय क्रिकेट संघा टीमवर स्तुतिसुमने उधळली आहेत. आयसीसीने टीम इंडियाला भगव्या रंगाची जर्सी परिधान करण्यास दिलेल्या परवानगीवर थरुर म्हणाले, भारताचा भगवा रंग गौरवशाली आहे. जेव्हा दोन संघांची जर्सी एकसारखी होते, तेव्हा एका टीमच्या जर्सीचा रंग बदलावा लागतो. भारताने स्वतःच्यासाठी भगव्या आणि निळ्या रंगांच्या जर्सीची निवड केल्याचे योग्यच असल्याचे थरुर म्हणाले.

 
 
थरुर म्हणाले, इंग्लंडच्याविरोधातील सामन्यात भारताचे समर्थन करण्यासाठी मी निळ्या पॉकिटचे भगवे जॅकेट परिधान केले होते. भाजपाचे भगव्या रंगाशी असलेले नाते पाहून काही विरोधकांना भगव्या रंगाची जर्सी खटकली आहे. परंतु, या भगव्या रंगाचा भाजपा किंवा अन्य कुठल्याही संघटनेशी-पक्षाशी काही संबंध नसल्याचे आयसीसीमधील एका सूत्राने एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. 
 
'टीम इंडियाची नवी जर्सी अमेरिकेतील डिझायनर्सनी तयार केली आहे. हे डिझाइन करताना, चाहत्यांना अगदीच वेगळे, अनोळखी वाटू नये, असा विचार झाला. टीम इंडियाच्या जुन्या टी-२० जर्सीमध्ये ऑरेंज पट्ट्या आहेत. सध्याच्या जर्सीची कॉलर आणि त्यावरचे 'इंडिया' हे नावही ऑरेंज रंगात आहे. त्यामुळे या रंगसंगतीत थोडी अदलाबदल करून डिझाइन्स केली गेली. ती बीसीसीआयला पाठवण्यात आली आणि त्यांनी सर्वोत्तम डिझाइन निवडले', असे आयसीसीतील सूत्राने सांगितले.