माऊलींच्या पालखी सोहळ्यात विनोद तावडेंचा सहभाग

    दिनांक :07-Jul-2019
 
 
सोलापूर:  वारी म्हणजे परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्याचा मार्ग आहे. वारीच्या माध्यमातून समाजाला समाजामध्ये जाऊन पाहणे व त्या समाजाकडून सकारात्मक गोष्टी शिकणे तसेच वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा असा संदेश देणारी ही वारी असते. भागवत धर्माची पताका उंचावत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत आज उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले. नातेपुते ते मांडवे या पालखीच्या मार्गामध्ये वारकऱ्यांबरोबर पायी चालत व वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी हा मार्ग पूर्ण केला. यावेळी तावडे यांनी वारकऱ्यांबरोबर टाळ आणि मृदुंगाचा ताल धरला आणि मुखाने जय हरी विठ्ठलाचा जप केला.
पंढरपूरच्या या आषाढी वारीला राज्य सरकारच्या वतीने सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या असल्याचे तावडे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या स्वच्छता मोहिमेचेही त्यांनी कौतुक केले.