कर्नाटकात काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा, सरकार वाचवण्यासाठी धडपड

    दिनांक :08-Jul-2019
- मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता 
 
 
 
कर्नाटकमधील राजकीय नाट्य सातत्याने नवनवीन वळणं घेत असून कुमारस्वामी सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. काँग्रेस-जेडीएसच्या १३ आमदारांपाठोपाठ आता काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. बंडखोर आमदारांना संधी देण्याच्या दृष्टीने काँग्रेसने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे. परंतु, तेवढ्याने हे संकट टळेल का, की नव्या संकटाला आमंत्रण देईल, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.
 
 
 
आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेलं एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळण्याची शक्यता शनिवारपासून निर्माण झाली आहे. कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील १३ आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आलं आहे. सरकार वाचविण्यासाठी आघाडीचे नेते निकराचे प्रयत्न करत आहेत, तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकाविण्यासाठी भाजपचे नेते सज्ज आहेत.
 
 
 
कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे. परंतु, १३ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामींच्या पाठीशी १०५ आमदारांचंच बळ आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. हे निमित्त साधून, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत आहेत.
 
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य भाजपा नेत्यांनीच कुमारस्वामी सरकार पाडण्याची खेळी रचल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यावरून एकीकडे भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकी झडत आहेत.
 
 
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून नेत्यांचे प्रयत्न सुरू असतानाच, कर्नाटक सरकारमधील अपक्ष आमदार नागेश यांनीही आज सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तेही भाजपाच्या जवळ जात असल्याचं समजतं. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या अडचणीत वाढच झालीय.
 
या पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या सर्व २१ मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यानं कर्नाटकातील राजकीय नाटकाला कशी कलाटणी मिळते, याकडे लक्ष लागलंय. आज संध्याकाळपर्यंत किमान सहा ते सात आमदार घरवापसी करतील, असा दावा कर्नाटकातील मंत्री जमीर अहमद खान यांनी केला आहे.