कर्नाटकात सरकार अस्थिर करण्यामागे अमित शाह, नरेंद्र मोदी : सिद्धरामय्या

    दिनांक :08-Jul-2019
बंगळुरू,
भाजपा आमच्या आमदारांना धमकावण्यासाठी केंद्र सरकार आणि त्यांच्या यंत्रणांचा गैरवापर करत आहे. यामागे फक्त कर्नाटकातीलच भाजपा नेते नाहीत तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे हुकूमशहा सुद्धा आहेत. ते विश्वासघातकी आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.
 
 
मागच्या वर्षभरापासून भाजपा आमचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होती. ही त्यांची सहावी वेळ आहे. नक्कीच ते यशस्वी होणार नाहीत. त्यांना लोकांच्या क्रोधाचा सामना करावा लागेल. आमच्या सरकारने सामाजिक न्यायाबरोबर प्रादेशिक संतुलनही व्यवस्थित साधलं आहे हे पचवणं त्यांना जड जातय असे सिद्धरामय्या म्हणाले.
सरकार वाचवण्यासाठी मदत म्हणून आमच्या मंत्र्यांनी स्वच्छेने राजीनामे दिले. ज्या आमदारांना मंत्रीपदाची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांना आम्ही सामावून घेण्याचा प्रयत्न करु. सामाजिक बांधिलकी आणि प्रादेशिक महत्वकांक्षा लक्षात घेऊन आम्ही मंत्रिमंडळाची फेररचना करु असे सिद्धरामय्या म्हणाले.
 
 
मी काँग्रेस पक्षाच्यावतीने राजीनामे देणाऱ्या सर्व आमदारांना निर्णयाचा पूनर्विचार करण्याचे आवाहन करतो असे सिद्धरामय्या म्हणाले. सरकार कोसळणार नाही. सुरळीत कारभार सुरु राहिल. काही मुद्दे आहेत त्यावर तोडगा काढला जाईल असे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले. कर्नाटकात १४ आमदारांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे कुमारस्वामी सरकार अडचणीत सापडले आहे.