विक्रीयोग्य स्थावर मालमत्तेची यादी केंद्रातर्फे तयार

    दिनांक :08-Jul-2019
- एक लाख कोटींच्या निधीउभारणीचे उद्दिष्ट
नवी दिल्ली,
विक्रीयोग्य स्थावर मालमत्तेची यादी केंद्र सरकारने तयार केली आहे. या स्थावर मालमत्तेची विक्री करून महसूलप्राप्तीचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सदर विक्री प्रक्रियेस लवकर अंतिम रूप देण्यात येईल, अशी माहिती गुंतवणूक विभागातील सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापनाचे सचिव अतानु चक्रवर्ती यांनी वृत्तसंस्थेस दिली. या मालमत्तांच्या धोरणात्मक विक्रीबाबत सरकार अनुकूल असून, निर्गुंतवणुकीमध्ये स्वारस्य दर्शविणार्‍या तीन उपक्रमांची माहिती पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले.
 

 
 
चक्रवर्ती म्हणाले की, धोरणात्मक निर्गुंतवणुकीमध्ये प्रत्येक प्रकरण वेगवेगळे हाताळायचे सरकारने ठरविले आहे. यासाठी चक्रवर्ती यांनी एअर इंडियाचा दाखला दिला. एअर इंडियाप्रमाणेच आणखी तीन उपक्रमांची माहिती जाहीर करण्यात येईल. साखळीतील कडीप्रमाणे एक-एक कडी यामध्ये जोडण्यात येईल, असे उदाहरण त्यांनी या प्रक्रियेसाठी दिले.
 
निर्गुंतवणुकीकरण आणि स्थावर मालमत्ता विक्री या माध्यमातून सरकारला या वर्षी एक लाख कोटींपेक्षा जास्त निधीची उभारणी करायची आहे. मात्र, यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे, असे ते म्हणाले. यातून महत्त्वाची संसाधन-उभारणी साधता येईल. अर्थव्यवस्था मंदावली असताना आणि कर महसूल पाहिजे तितका उत्साहवर्धक नसल्याने या संदर्भात प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
 
सूचिबद्ध कंपन्यांमधील सार्वजनिक समभागांच्या मालकीची पातळी वाढविण्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. त्याचा उल्लेख करीत चक्रवर्ती म्हणाले की, यामुळे शेअर बाजारात निधीच्या पुरवठ्यास चालना मिळू शकेल.