उस्मानाबाद नगरपालिकेचाही साहित्य संमेलनाच्या मागणीसाठी ठराव

    दिनांक :08-Jul-2019
उस्मानाबाद: आगामी 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे यजमानपद उस्मानाबादला मिळावे यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने साहित्य महामंडळाकडे मागणी केली आहे. या मागणीच्या समर्थनार्थ उस्मानाबाद नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी एकमताने ठराव घेण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्याला संमेलन आयोजनाचा सन्मान मिळावा याकरिता मराठवाडा साहित्य परिषदेच्या मागणीला बळ देणारा ठराव आपण घेतला असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.

 
मागील चार वर्षांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यंदा हा सुवर्णयोग जुळून येण्याची शक्यता आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सातत्यपूर्ण मागणीची यंदा गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. आता केवळ संमेलन आयोजनाच्या आपल्या प्रस्तावास साहित्य महामंडळाकडून हिरवा कंदील मिळणे बाकी आहे. तत्पूर्वी आपण उस्मानाबादकर संमेलन आयोजित करण्यास सर्वार्थाने पात्र आहोत का? याची खात्री महामंडळास पटणे गरजेचे आहे. त्यासाठी नगरपालिकेच्यावतीने मसापाच्या मागणीला समर्थन देणारा ठराव घेतला आहे.