CWC2019 : भारताला विश्वचषक जिंकताना बघायचे आहे : शोएब अख्तर

    दिनांक :08-Jul-2019
नवी दिल्ली,
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज खुद्द शोएब अख्तरने विश्वचषकावर भारताने नाव कोरण्याची इश्चा व्यक्त केली आहे. तसेच आशिया खंडातील देशानेच विश्वचषकावर बाजी मारावी असे त्याने म्हटले आहे. 
 
"मला आशा आहे की यावेळी न्यूझीलंड चोकर्स सिद्ध होणार नाहीत. मात्र, महत्वाच्या सामन्यात न्यूझीलंड दबाव झेलू शकत नाही. खरे तर माझी विश्वचषक भारतीय उप-खंडात यावा अशी इच्छा आहे आणि त्यासाठीच मी भारताचे समर्थन करणार आहे", असे मत शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनेलवरुन मांडले आहे.
"रोहित शर्माने आतापर्यंत आठ सामन्यात पाच शतके ठोकली आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्ध 103 धावांची शतकी खेळी केली. रोहितची अचूक वेळ आणि उत्तम फटके निवड उत्तम आहे. खेळाबदद्ल त्याचा समज विलक्षण आहे. तसेच राहुलनेही श्रीलंकेच्या विरुद्ध शतक पूर्ण केले असून ही एक चांगली बाजू आहे." असेही शोएब अख्तर म्हणाला.
दरम्यान विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होईल. हा सामना नऊ जुलै रोजी मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात येईल. विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना 11 जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येईल. या सामन्यात यजमान इंग्लंडचा मुकाबला त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाशी होईल.
सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या खणखणीत शतकांच्या जोरावर टीम इंडियाने शनिवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा यंदाच्या विश्वचषकातला सातवा विजय ठरला.
सात सामन्यातील विजय (14 गुण) आणि एका रद्द सामन्यामधून मिळालेला 1 गुण मिळून 15 गुणांसह भारताने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. तर 5 विजयांसह न्यूझीलंडच्या संघाने 11 गुण मिळवले आहेत. न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.
दरम्यान नऊ सामन्यांपैकी सात विजयांसह ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडच्या संघाने सहा विजयांसह 12 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणार आहे.