राजीनामा देण्याची परंपरा तर राहुल गांधींनीच सुरू केली : राजनाथ सिंह

    दिनांक :08-Jul-2019
नवी दिल्ली,
कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत लोकसभेत सोमवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, आमच्या पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही, आमच्या पक्षाने कधीच घोडेबाजार केलेला नाही. तर राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत राजनाथ सिंह म्हणाले की, राजीनामा देण्याची परंपरा तर राहुल गांधींनी सुरू केली आहे. मग जर अशावेळी काँग्रेसमधील कोणी राजीनामा देत असेल तर त्यासाठी भाजपाला जबाबदार ठरवणे चुकीचे आहे.

 
आम्ही संसदीय लोकशाहीची पवित्रता कायम राखण्यासाठी कटीबद्ध आहोत. राजीनामे देण्याची परंपरा काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांनीच सुरू केली आली आहे, आमच्याकडून याची सुरूवात झालेली नाही. त्यांनी स्वतःच कार्यकर्त्यांना राजीनामे देण्यास सांगितले, एवढेच नाहीतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील राजीनामे देत आहेत.
 
 
याप्रकरणी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला होता. कर्नाटकात काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर आज काँग्रेसच्या तब्बल २२ मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नाहीतर उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते परमेश्वर यांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे.