कुणाकुणाला रोखणार?

    दिनांक :08-Jul-2019
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेला तिढा सोडविण्यात अजूनही ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांना यश मिळाले नसताना, कर्नाटकात एका नव्या राजकीय नाट्याला प्रारंभ झाला आहे. हे नाट्य दुसर्‍यांदा सुरू होणारच होते. आता या नाटकाचा शेवट कसा होतो, हे आगामी आठवड्यात स्पष्ट होईल. सत्ता भाजपाची येते, की पुन्हा नवीन नाट्य घडते, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ही पळापळ का सुरू झाली, याचे कारणही वेगळे सांगण्याची गरज नाही. जेव्हापासून राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून कॉंग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. नवा चेहरा कोण येणार, हेही अजून गुलदस्त्यातच आहे. गांधी नावाला एक वलय होते. तेसुद्धा आता राहणार नाही, मग आपले भवितव्य काय, नवा अध्यक्ष कोणती भूमिका घेईल, असे अनेक प्रश्न कॉंग्रेसजनांपुढे उपस्थित होणे स्वाभाविक आहे. प्रश्न असा निर्माण झाला आहे की, कॉंग्रेस कुणाकुणाला रोखणार आणि कोणता नेता रोखणार? कारण, पक्षाला तर नेताच राहिलेला नाही. आज कर्नाटकात कॉंग्रेस आमदारांचे राजीनामासत्र सुरू झाले, उद्या ते मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्येही सुरू झाले तर आश्चर्य वाटायला नको. कॉंग्रेस नेत्यांनी जरी नेहमीप्रमाणे खापर भाजपाच्या डोक्यावर फोडले असले, तरी त्यांनी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत बोलताना म्हटलेला एक शेर आठवावा-
‘ताउम्र गालीब यही भूल करता रहा,
धूल चेहरे पर थी, आईना साफ करता रहा...’
 
 
 
त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे काय अन्‌ रणदीप सुरजेवाला काय, दोघांनीही भाजपावर आगपाखड करण्यात काहीही अर्थ नाही. कर्नाटकासारखीच अगदी काठावरची स्थिती मध्यप्रदेशातही आहे. तेथे कमलनाथ सरकार केव्हा कोसळेल, याची शाश्वती नाही. तूर्त कर्नाटकात पोळा फुटला आहे. कॉंग्रेसच्या 11 आणि जद (एस)च्या तीन आमदारांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. यामुळे कुमारास्वामी सरकार अल्पमतात आले आहे. कुमारास्वामी सध्या अमेरिकेत आहेत. ते आपल्या राज्यात विकास प्रकल्प यावेत, गुंतवणूक यावी म्हणून अमेरिकन उद्योगपतींना गळ घालत आहेत. इकडे हे राजीनामानाट्य सुरू आहे. कॉंग्रेसच्या ज्या 11 आमदारांनी राजीनामे दिले आहेत, त्यापैकी तिघांचे असे म्हणणे आहे की, कुमारास्वामींना बाजूला करून सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करा. याचा अर्थ स्पष्ट आहे. ते चूप बसले असते तर झाकली मूठ लाखाची होती. पण, सिद्धरामय्या यांचे नाव घेतल्याने कॉंग्र्रेसश्रेष्ठींचे कान टवकारले आहेत. तिकडे जद (एस)च्या आमदारांनी कुमारास्वामी यांच्या संयुक्त सरकारवर तोंडसुख घेतले आहे. हे सरकार आपले कर्तव्य पार पाडण्यात आणि जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे. या 14 जणांनी आपापले राजीनामे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांना सादर केले आहेत. रमेश कुमार हे कॉंग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर पूर्णपणे खेळ आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकार तरो की पडो, मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. जे काही शक्तिप्रदर्शन होईल, ते विधानसभा सभागृहात होईल. त्यांचे असेही म्हणणे आहे की, रविवारी नियमानुसार कामकाज होत नाही. सोमवारी मी पूर्वनिर्धारित कार्यक्रमात व्यस्त आहे. काय जे करायचे ते मंगळवारी पाहू. तेव्हा आता मंगळवारपासून अधिकृत कारवाईला प्रारंभ होईल. दरम्यान, या 14 आमदारांनी राज्यपाल वजुभाई वाला यांचीही भेट घेतली व आपले राजीनामा पत्र सादर केले.
सध्या भाजपाकडे 105 जागा आहेत. कॉंग्रेसचे 79 आणि जद (एस)चे 37 आमदार आहेत. युतीनंतर ही संख्या होते 116. दोन अपक्ष आणि एक बसपा अशा समर्थनाने सरकार टिकून होते. कर्नाटक विधानसभेत एकूण 224 जागा आहेत. बहुमतासाठी 113 हा आकडा हवा होता. पण, आता 14 जणांनी राजीनामे दिल्यामुळे युतीची संख्या घटून ती 102 राहिली आहे. मूळ संख्याही 210 वर आली आहे. आता जो कुणी 106 आमदारांचे समर्थनपत्र सादर करेल, त्याच्याकडे सत्ता जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हे असंतुष्ट आमदार थांबले होते. निकाल आल्यानंतर भाजपाचे स्वत:चे 25 आणि समर्थन दिलेला एक सदस्य असे 26 सदस्य निवडून आले आहेत. कॉंग्रेसला एक आणि जद (एस)ला एक अशा दोनच जागा मिळाल्या. तेव्हापासूनच राज्यात वादळ उठले आहे. रमेश कुमार यांनी म्हटल्यानुसार विधानसभेत शक्तिपरीक्षणाची वेळ आली तर कुमारास्वामी सरकार अल्पमतात येईल व कुमारास्वामी यांना तत्काळ राजीनामा द्यावा लागेल. ज्या वेळी विधानसभेचे निकाल लागले होते, त्या वेळी भाजपाने आपल्याकडे सत्ता खेचण्यासाठी प्रयत्न केले होते, पण ते अयशस्वी ठरले होते. तेव्हापासून दिल्लीश्वरांनी कर्नाटक भाजपाला ‘थांबा आणि वाट पाहा,’ असा संदेश दिला होता. आता भाजपाचे नेते समोर येत आहेत. सदानंद गौडा यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आम्हाला संधी दिली तर आम्ही सरकार बनविण्यास तयार आहोत. आमचे सरकार आल्यास मुख्यमंत्री येदियुरप्पा हे असतील. याचा अर्थ भाजपाच्या दिल्लीतील ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी हिरवी झेंडी दिलेली दिसते. या सर्व घडामोडींमुळे कॉंग्रेसचा तिळपापड होणे स्वाभाविक आहे. हा लोकशाहीचा अपमान, संविधानाचा उपमर्द असल्याची टीका वगैरे त्यांनी केली. पण, याला काही अर्थ नाही. स्वत:चा पक्ष सांभाळण्यात युतीचे दोन्ही पक्ष असमर्थ असल्यामुळेच हे राजीनामे आले आहेत, हे स्पष्टच दिसत आहे.
सात वेळा निवडून आलेल्या रामलिंगा रेड्‌डी यांनी राजीनामा देताना आपली व्यथा मांडली आहे. सात वेळा निवडून आलो तरी मला मंत्रिपद मिळालेले नाही. मग अशा पक्षात राहून काय फायदा? कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. एच. विश्वनाथ, ज्यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला होता आणि आता आमदारकीचाही राजीनामा दिला आहे, त्यांचे म्हणणे आहे की, यात भाजपाचा मुळीच हात नाही. कुमारास्वामी आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्यामुळेच हा उठाव झाला आहे. या आमदारांचे राजीनामे मंजूर होणारच आहेत. अशा स्थितीत जागा उरतात 210 आणि बहुमताचा आकडा होतो 106. भाजपाकडे 105 जागा आहेत. दोन अपक्षांचा पािंठबा मिळाला तर जागा होतात 107. म्हणजे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल. कारण, अपक्षांचे जिधर सत्ता उधर हम असे असते. विधान परिषदेचे पाच नामनियुक्त सदस्य जून 2020 मध्ये निवृत्त होतील. तेव्हा काही जणांची वर्णी लागेल. काही जणांना मंत्रिपद, महामंडळे मिळतील. पण, अंतिम निर्णयासाठी भाजपाला काही दिवस वाट पाहावी लागेल. दरम्यान, सत्ता वाचविण्यासाठी कॉंग्रेसने एक नवीच चाल खेळली आहे. कॉंग्रेसच्या काही मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत आणि असंतुष्टांसाठी वाट मोकळी करून द्यावी, असे कॉंग्रेस श्रेष्ठींचे सांगणे आहे. कदाचित, काही मंत्र्यांना जबरीने घरी बसविले जाण्याची शक्यता आहे. यामुळे तेथे आणखीच गोंधळ उडालेला आहे. कोण मंत्री आपले पद सोडायला तयार होईल? हे म्हणजे आणखी फुटीला आमंत्रण देणारे व भाजपाचे बहुमत वाढविणारे ठरणार आहे. कॉंग्रेसचे डोके ठिकाणावर नसल्याचे हे चिन्ह आहे. तुम्ही कुणाकुणाला रोखणार आहात? आणि तुमचे ऐकतो कोण? ‘विनाशकाले विपरीत बुद्धी!’ दुसरे काय?