’आर्टिकल 15’ : सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

    दिनांक :08-Jul-2019
- योग्य प्राधिकार्‍याकडे तक्रार करण्याचे निर्देश
नवी दिल्ली,
‘आर्टिकल 15’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिल्याचा विरोध करीत चित्रपटाला सर्वोच्च न्यायालयात खेचणार्‍या ब्राह्मण समाज ऑफ इंडिया या संघटनेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकेतील मुद्यांबाबत योग्य प्राधिकार्‍याकडे तक्रार करण्याचे निर्देशही यावेळी न्यायालयाने दिलेत.
 

 
 
न्या. शरद बोबडे आणि न्या. भूषण गवई यांच्या न्यायासनाने ही याचिका फेटाळून लावत सदर निर्देश दिलेत. ब्राह्मण समाज ऑफ इंडिया या संघटनेने हा सिनेमा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत असून, यातील आक्षेपार्ह संवादामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे नमूद करीत याचिका दाखल केली होती. या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी देखील संघटनेने केली होती. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल 15’ चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 28 जून रोजी प्रदर्शित झाला असून, तिकीटबारीवर त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.