वारंवार नोकरी बदलताय?

    दिनांक :08-Jul-2019
अनेकजण वरचेवर नोकरी बदलतात. एकाच ठिकाणी तीन ते चार वर्षं काम केल्यानंतर ते नव्या संधी शोधतात. मात्र सातत्याने नोकरी बदलणार्‍यांनी कराचा बोजा कमी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. नोकरीचा राजीनामा देणार्‍या कर्मचार्‍याला अर्न्ड लिव्ह एनकॅशमेंट आणि ग्रॅच्युुइटी मिळते. यासोबतच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा झालेली रक्कमही तुम्ही काढून घेऊ शकता. ग्रॅच्युइटीचे लाभ मिळण्यासाठी कर्मचार्‍याने किमान पाच वर्षं नोकरी करणं गरजेचं असतं तर अर्न्ड लिव्ह एनकॅशमेंट काही प्रमाणात करमुक्त आहे. अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर तुमचं पूर्ण नियंत्रण असतं. त्यामुळे याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तुम्हाला जास्तीचा कर भरावा लागू शकतो. मात्र योग्य माहिती घेऊन निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही किंवा करात सवलती मिळू शकतील. 
 
 
प्रॉव्हिडंट फंड खातं सुरू केल्याला पाच वर्षं पूर्ण होण्याआधी नोकरी बदलली तर जुन्या पीएफ खात्यातली शिल्लक रक्कम नव्या कंपनीने तुमच्यासाठी उघडलेल्या पीएफ खात्यात लगेच वर्ग करायला हवी. यामुळे या रकमेवर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. शिल्लक रक्कम एका कंपनीकडून दुसर्‍या कंपनीच्या पीएफ खात्यात वर्ग केल्यामुळे तुमचा कर वाचेल शिवाय दहा वर्षांनंतर तुम्ही निवृत्तीवेतनाला पात्र ठराल. दरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतली रक्कम पाच वर्षं पूर्ण होण्याआधी काढली तर त्यावर कर भरावा लागेल. त्यामुळे पीएफमधल्या रकमेवरचा कर वाचवण्यासाठी तुम्ही दक्ष रहाणं गरजेचं आहे.