योजना टर्म विम्याची

    दिनांक :08-Jul-2019
विमा पॉलिसीमुळे आपल्याला कमी हप्त्यात अधिक रकमेचं विमा संरक्षण मिळतं. टर्म विमा हा अत्यंत लाभदायी असा पर्याय आहे. टर्म विम्याचे अनेक प्रकार असले तरी रिटर्न ऑफ प्रिमियम(आरओपी) हा प्रकार अधिक लोकप्रिय ठरला आहे. आरओपीअंतर्गत विम्याचा कालावधी संपल्यानंतर विमाधारकाला आजवर भरलेल्या हप्त्याची रक्कमही परत दिली जाते. त्यामुळे विमाधारकांना रिटर्न ऑफ प्रिमियम पॉलिसी अधिक आकर्षित करते. विमा पॉलिसीतून चांगल्या परताव्याची अपेक्षा करणार्‍या गुंतवणूकदारांसाठी टर्म विम्याची रिटर्न ऑफ प्रिमियम पॉलिसी अनेक अर्थांनी उपयुक्त ठरेल. 

 
 
टर्म विमा पॉलिसीअंतर्गत आपल्या आर्थिक गरजांनुसार टर्म किंवा कालावधी ठरवता येतो. टर्म विमा पॉलिसी 20, 25, 30 आणि 40 वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून दिली जाते. तुम्ही 20 वर्षांसाठी कर्ज घेतलं असेल तर 20 वर्षांची टर्म विमा पॉलिसी घेता येईल. मधल्या काळात घरातल्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला िंकवा काही कारणांमुळे उत्पन्न बंद झालं तर कर्जाची परतफेड करताना अडचणी येणार नाहीत. तसंच 20 वर्षांनंतर विमाधारकाला त्याने हप्ता म्हणून भरलेले सर्व पैसे परत मिळतील.
 
 
पारंपरिक टर्म विमा पॉलिसीच्या तुलनेत रिटर्न ऑफ प्रिमियम पॉलिसीचे कालावधी पूर्ण झाल्यानंतरचे लाभ अधिक़ लाभदायी ठरतात. मुख्य म्हणजे विमा संरक्षण असलेल्या कालावधीतले सर्व हप्ते आपल्याला परत दिले जातात. काही योजनांमध्ये तर विमाधारकाला भरलेल्या एकूण हप्त्यापेक्षाही जास्त धनलाभ होतो. अर्थात यासाठी विमाधारकालाा काही नियम आणि अटींचं पालन करावं लागतं. तसंच कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळालेली टर्म विम्याची संपूर्ण रक्कम करमुक्त असते. टर्म विमा घेताता आरओपीचा पर्याय निवडण्यावर भर द्यावा.