औरंगाबादच्या वामन हरी पेठेमधून तब्बल ६७ किलो सोन्याची चोरी ; तपासात माहिती उघड

    दिनांक :08-Jul-2019
औरंगाबाद: औरंगाबादच्या वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत तब्बल 58 किलो सोन्याची चोरी झाल्याचा प्रकार समोर होता. औरंगाबाद समर्थ नगर शाखेच्या मॅनेजरनेच ही चोरी केल्याचेही उघड झाले होते. या प्रकरणी तपासात नवी माहिती समोर आली आहे.  या चोरीत आणखी नऊ किलो सोने चोरीला गेल्याचे ऑडिटनंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वामन हरी पेठे ज्वेलर्समधून मॅनेजरच्या मदतीने तब्बल 67 किलो सोनं चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
 
 
औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. यातील राजेंद्र जैन यांनी वेगवेगळ्या 24 बँकांमध्ये तब्बल 72 अकाऊंट उघडल्याचेही स्पष्ट झाले आहे. यापैकी काही अकाऊंट त्याची पत्नी, मुलगा आणि ड्रायव्हरच्या नावावर देखील आहेत. याबरोबरच राजेंद्र जैन याने चोरी केलेले सोनं विकून तब्बल 14 चार चाकी गाड्या विकत घेतल्याचेही समोर आलेले आहे.
सोन्याच्या पैशातून विकत घेतलेल्या याच चारचाकी गाड्यातून तो त्याचे ऑफिस देखील चालवत असल्याची माहिती आहे. याशिवाय औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तीन फ्लॅटही त्याने खरेदी केले आहेत. पोलिसांनी या सगळ्या अकाऊंटबद्दलची माहिती बँकांकडून मागवली आहे. याशिवाय कुठे त्याने आणखी लॉकरमध्ये सोनं ठेवले आहे का याचीही औरंगाबाद पोलीस चौकशी करत आहेत.