रिक्षा चालकांचा आज मध्यरात्रीपासून संप

    दिनांक :08-Jul-2019
मुंबई : मुंबईकरांना उद्या प्रवासासाठी हाल सहन करावे लागू शकतात कारण  विविध मागण्यांसाठी मुंबई, ठाणे आणि राज्यातील रिक्षावाले आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. रिक्षा भाडेवाढ त्वरित करावी, अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी, ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवा बंद कराव्यात या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत.

 
रिक्षाचालकांना भाडेवाढ मिळावी, रिक्षाचालक-मालक यांच्यासाठी असलेले कल्याणकारी मंडळ परिवहन खात्याच्या अंतर्गत असावे, ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवा बंद करण्यात याव्यात अशाही मागण्या करण्यात आल्या आहे. परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात वारंवार बैठका झाल्या आहेत. पण त्यामध्ये देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत कोणतीही पावलं उचलली गेली नसल्याने रिक्षाचालकांनी संप पुकारल्याचे सांगण्यात येत आहे.