खुल्या प्रवर्गांना नोकरी द्या; अन्यथा बॉम्बहल्ला

    दिनांक :08-Jul-2019
विद्यापीठ परिसरात धमकीची भित्तिपत्रके
 
नागपूर: खुल्या प्रवर्गातील गरीब युवकांना नोकरी देण्यात यावी अन्यथा त्याचे सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाची भित्तिपत्रके नागपूर विद्यापीठ परिसरात आढळून आल्याने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन विशेष पथकामार्फत तपास सुरू केला आहे.
सोमवारी सकाळी आठच्या सुमारास रस्त्याने जाणार्‍या काही नागरिकांना अमरावती मार्गावर असलेल्या बसथांब्यांच्या भिंतीवर तीन पत्रके चिकटवलेली आढळली. त्या पत्रकांमध्ये शासनाला धमकी देण्यात आली होती. ‘खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना नोकरी द्या. अन्यथा बॉम्बने उडवून टाकू. अनेक कुटुंबांना बॉम्बने उडवून टाकू, आमच्याकडे शार्प शूटर आणि हल्लेखोर आहेत. त्यांच्याकरवी हल्ला करण्यात येईल. तसेच यमराज की उंगली रिमोटपर हैं अशी धमकीयुक्त वाक्ये पत्रकात लिहिली होती.
ही माहिती समजताच अंबाझरी आणि सीताबर्डी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी भिंतीवरील धमकीची पत्रे काढून ताब्यात घेतली. हे कृत्य कुणाचे? याबाबत पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांना विचारणा केली असता अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
 
 
एटीएस सतर्क
या प्रकारामुळे शहर पोलिस दलात एकच खळबळ उडून पोलिस सतर्क झाले आहेत. बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्यामुळे दहशतवाद विरोध पथक (एटीएस) सतर्क झाले. एटीएसच्या अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. एटीएसने देखील हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. त्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून, पथकाच्या कर्मचार्‍यांनी गुप्त माहिती काढण्यास सुरुवात केली आहे.