२५ गोतस्करांना गावकर्‍यांनी पकडले; ८ वाहने, २४ जनावरे ताब्यात

    दिनांक :08-Jul-2019
धारणी नजीकच्या मध्यप्रदेश सीमेतील घटना
 
धारणी: जवळच्या मध्य प्रदेशातील ग्राम सावलीखेडा गावातून धारणीकडे येताना 8 पिक अप गाड्या, 24 गाय-बैल आणि एकूण 25 आरोपींना गावकर्‍यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याने कुतुहल व्यक्त होत आहे.
धारणीपासून 28 कि.मी. अंतरावर मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्याच्या खालवा तालुक्यातील सावलीखेडा गावाजवळ ही घटना घडली. येथील सामाजिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते विनोद जयस्वाल, प्रिन्स मेहता, राजेश लौवंशी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी धारणीकडून अकोटला जाण्यासाठी येणार्‍या 8 पिकअप वाहनांना अडवून 24 गोवंश ताब्यात घेतले, तर 25 आरोपींना पकडून ठेवले. दरम्यान आरोपींकडून उठक बैठक करुन घेण्यात आली आणि ‘गौमाता की जय’च्या घोषणा करण्यात आल्या.

 
 
खालवा-देडतलई मार्गाने गोवंशाची तस्करी नेहमी होत असते. खालवापासून धारणी व अकोटपर्यंत एजंट नेमलेले असून धारणीच्या धुळघाट (रेल्वे) गावात वाहनांची अदला-बदली करण्यात येत व तेथून गोवंश अकोटच्या कत्तलखान्यापर्यंत पोहचविण्यात येते, असे समजते. सर्व आरोपींना मुद्देमालासह खालवा येथील पोलिस ठाण्यापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचविले. ठाणेदार एच. एस. रावत यांनी सर्वांविरुद्ध म. प्र. गोवंश प्रतिबंध अधिनियमनांतर्गत गुन्हा दाखल करुन 24 जनावरांना खारकला गावातील गोशाळेत पाठविले. एकूण 39 लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आलेला आहे. तीन दिवसापूर्वी या कार्यकर्त्यांनी 96 म्हशींची तस्करी करणार्‍यांना रंगेहात पकडले होते. खंडवाचे पोलिस अधीक्षक डॉ. शिवदयाल सिंह यांनी अवैध गोवंश परिवहन किंवा तस्करीविषयी माहिती देण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले होते. ही घटना 7 जुलैच्या दुपारची असून घटनेमुळे अकोट व धारणी भागातील तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.