गली बॉयचा दक्षिण कोरियात डंका

    दिनांक :08-Jul-2019
झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. इतकंच नाही तर या चित्रपटाने विदेशी प्रेक्षकांचीही मन जिंकली. या चित्रपटाने काही रेकॉर्डसही मोडले असून आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ‘गली बॉय’ या चित्रपटाला दक्षिण कोरियामध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
 
 
दक्षिण कोरियामध्ये २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅटास्टिक फिल्म फेस्टिवलमध्ये (बीआयएफएएन) या चित्रपटाला ‘नेटवर्क फॉर द प्रोमोशन ऑफ एशियन सिनेमा’ (एनइटीपीएसी) हा पुरस्कार मिळाला आहे.
एनइटीपीएसीमधील काही सदस्य आणि कलाविश्वातील काही दिग्गज व्यक्ती यांचा समावेश एनइटीपीएसी निवड समितीमध्ये असतो. ही समिती वर्ल्ड फॅटास्टिक ब्लू सेक्शनमधून सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटाची निवड करतात. ही निवड करताना विनोदीपट, ड्रामा या प्रकारामध्ये मोडणारे आणि नव्या धाटणीचे व आशयपूर्ण चित्रपटांचा विचार करण्यात येतो.
दरम्यान, झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा सादर करण्यात आली आहे.