भारतीय वायुदलाची १७० विमानांच्या प्रकल्पांना मंजुरी

    दिनांक :08-Jul-2019
 
दिल्ली,
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन दिवसांतच भारतीय वायुदलाने १७० लढाऊ विमानांच्या दोन प्रकल्पांवर शिक्कामोर्तब केला आहे. यातील पहिला प्रकल्प ५६ दळणवळण करणाऱ्या विमानांचा आहे तर दुसरा प्रकल्प ११४ लढाऊ विमानांचा आहे. या दोन्ही प्रकल्पांची एकूण किंमत १.५ लाख कोटी इतकी आहे.

भारतीय वायुदलाच्या ताफ्यातील लढावू विमानांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. लवकरात लवकर वायुदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज लढावू विमानांचा समावेश केला नाही तर येत्या काळात वायुदल पाकिस्तान आणि चीनला तोंड देण्यास असक्षम ठरेल. या पार्श्वभूमीवरच फ्रान्सशी ३६ राफेल विमानांचा करार करण्यात आला आहे. यापैकी ४ राफेल विमानं मे २०२०मध्ये वायुदलाच्या शस्त्रसाठ्यात दाखल होतील. वायुदलाची निकड पाहता टाटा एयरबसचा ५६ विमानांच्या प्रकल्पालाही वायुदलाने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल.
११४ लढाऊ विमानांच्या प्रकल्पासाठी वायुदलाने निधी मंजूर केला आहे. पण या लढाऊ विमानांच्या प्रकल्पाचे काम सुरु व्हायला अजून ५ वर्षं लागू शकतात. ११४ लढाऊ विमानांसाठी भारत कोणत्या देशाशी करार करणार, कोणत्या कंपनीला कंत्राट दिले जाणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. राफेल निर्मिती करणाऱ्या कंपनीलाच या लढाऊ विमानांचे कंत्राट मिळू शकते अशी चर्चा आहे.
२०२२ पर्यंत ३६ लढाऊ राफेल विमानं भारतीय वायुदलाच्या शस्त्रागरात दाखल होतील. तसंच ५६ एअरबसही त्या कालावधीपर्यंत वापरात येण्याची शक्यता आहे. पण ११४ लढाऊ विमानांची गरज भारत कशी भरून काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.