कंगना रनौट आणि पत्रकारामध्ये जोरदार भांडण

    दिनांक :08-Jul-2019
मुंबई:
अभिनेत्री कंगना रनौट आणि वाद विवाद यांचं नातं काही नवीन नाही. बॉलिवूड कलाकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या कंगनाच्या निशाण्यावर आता पत्रकार देखील आले आहेत. 'जजमेंटल है क्या' या चित्रपटातील एका गाण्याच्या लॉन्च कार्यक्रमात कंगनाचं तिथं उपस्थित एका पत्रकारासोबत भांडण झाल्यानं चांगलीच चर्चा सुरू आहे.
 
 
'जजमेंटल है क्या' हा कंगनाचा आगामी चित्रपट असून या चित्रपटातील गाण्याचा लॉन्च सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या दरम्यान उपस्थित पत्रकारांनी कंगनाला अनेक प्रश्न विचारले. एका पत्रकारानं प्रश्न विचारण्यासाठी त्याचं नाव सांगताचं कंगनानं त्याला सुनवायला सुरुवात केल्यानं चांगलाच गोंधळ उडाला.
पत्रकारानं कंगनाला प्रश्न विचारण्यापूर्वी त्याचं नाव सांगितलं. या पत्रकाराचं नाव ऐकताच कंगनाचा पारा काही क्षणातच वाढला. याच पत्रकारानं तिच्या 'मणिकर्णिका' या चित्रपटाबद्दल वाईट आणि नकारात्मक गोष्टी लिहिल्या होत्या, असा आरोप कंगनानं केला. कंगनाचा हा आरोप ऐकताच पत्रकारानंही तिला उत्तर देत सर्व आरोप फेटाळले. 'तू माझ्यावर असे आरोप करू शकत नाहीस... पत्रकार लिहितात ते खरं असतं. असं त्यानं म्हटलं.
'मणिकर्णिका' संबधित एका मुलाखतीदरम्यान हा पत्रकार माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तीन तास होता. आम्ही गप्पा गोष्टी करत एकत्र जेवणही केलं. मात्र नंतर यानं माझ्या आणि 'मणिकर्णिका' चित्रपटाबद्दल वाईट आणि खोटं लिहिलं....यानं मला मेसेजही केलेत' कंगनाच्या या आरोपानंतर पत्रकारही भडकला आणि कंगनानं केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. कंगनानं ट्वीट आणि मी पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीन शॉट दाखण्याची मागणी केली. यावर वेळ आल्यावर दाखवेन असं उत्तर कंगनानं दिलं.
दरम्यान, हा वाद वाढत असल्याचं पाहून उपस्थित अनेकांनी पत्रकार आणि कंगना या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी चित्रपटाची निर्माती एकता कपूर हिनं मध्यस्थी केली आणि वाद निवळला.