मुंबईत मुसळधार पाऊस; वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा

    दिनांक :08-Jul-2019
मुंबई: दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. पावसाचा फटका रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. मध्य रेल्वेवरील लोकलदेखील १५ ते २० मिनिटे तर हार्बर १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे कार्यालयांमध्ये जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
 
 
पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. विमान वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. जोरदार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणं २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहेत. तर काही उड्डाणे वळवण्यात आली आहेत. वांद्रे कलानगर, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, परेल, असल्फा या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा  अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.