सर्वोत्तम कामगिरीत पारस वीजकेंद्र देशात पाचवे

    दिनांक :08-Jul-2019
९५.३१ टक्के भारांक
संचालक पाच सूत्रीची किमया
अकोला: केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ३० जून २०१९ पर्यंत देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १५ औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून त्यामध्ये महानिर्मितीच्या २x२५० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा पाचवा क्रमांक आहे. यापूर्वी सलग तीन महिन्यांपासून पारस वीज केंद्राची कामगिरी देशात सरस ठरली आहे ज्यात एप्रिलमध्ये सहावा, मे मध्ये –चवथा आणि जून मध्ये-पाचवा क्रमांक पटकाविला आहे.

 
सर्वोत्तम कामगिरीत देशातील सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमरकंटक वीज केंद्र, मध्यप्रदेश (प्रथम-९८.८७ भारांक), एन.टी.पी.सी., तालचर ओरिसा (द्वितीय-९८.१८ भारांक), रिलायन्स ससान सिंगारोली मध्यप्रदेश (तृतीय-९६.५७ भारांक), बज बज आर.पी.संजीव गोयंका पश्चिम बंगाल(चवथे-९६.२२ भारांक) तर महानिर्मिती पारस वीज केंद्र (पाचवे- ९५.३१ भारांक).
सर्वोत्तम कामगिरी करणारे वरील तालचर,ससान हि दोन औष्णिक विद्युत केंद्रे कोळसा खाणीच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे कोळसा वहन खर्चात मोठी बचत होते व कोळसा सहज उपलब्ध होतो. पारस वीज केंद्र मात्र, कोळसा खाणीपासून किमान ३०० किलोमीटर दूर अंतरावर आहे. पारस वीज केंद्राला वेकोलि, महानदी कोल फिल्ड्स आणि एस.ई.सी.एल. च्या खाणींतून कोळसा पुरवठा करण्यात येतो. विविध तांत्रिक समस्यांवर वेळेत मात करून येथील कुशल मनुष्यबळाने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा/कौशल्याचा परिचय दिला आहे.
संचालक पाच सूत्री कार्यक्रमा अंतर्गत कमी कोळसा वापर, झिरो कोल डेमरेज, परिसरातील वातावरण सुधारणा व नवनवीन संकल्पना राबविण्यात येत असल्याने पारस वीज केंद्राची यशस्वी वाटचाल होत आहे आणि महानिर्मितीमध्ये क्रमांक एकचे विद्युत केंद्र म्हणून या केंद्राचा नावलौकिक असल्याचे डॉ.रवींद्र गोहणे यांनी सांगितले.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(वित्त) संतोष अंबेरकर, संचालक(खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, संचालक(प्रकल्प) वी. थंगपांडियन तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाने टीम पारसचे विशेष अभिनंदन केले आहे.
मुख्य अभियंता डॉ. रविंद्र गोहणे, उप मुख्य अभियंता मनोहर मसराम, अधिक्षक अभियंता रूपेन्द्र गोरे, ज्ञानेश्वर दामोधर यांनी सर्व अधिकारी, विभाग प्रमुख,अभियंता, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
आगामी काळात पारस वीज केंद्र देशात क्रमांक एकचे सर्वोत्तम कामगिरी करणारे वीज केंद्र होईल यादृष्टीने प्रत्येकाने आपले योगदान वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पारस वीज केंद्राचे मुख्य अभियंता डॉ.रवींद्र गोहणे यांनी केले.