PNB मध्ये 3 हजार 800 कोटींचा नवा घोटाळा

    दिनांक :08-Jul-2019
देशातील मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत आणखी एक मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर येत आहे. भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड(बीपीएसएल) या कंपनीकडून तब्बल 3 हजार 800 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, बँकेने यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडे तक्रार दाखल केली आहे.
 
 
यापूर्वी हिरे व्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 500 कोटी रूपयांचा गंडा घातला होता. हे प्रकरण ताजे असतानाच बँकेमध्ये आणखी एक नवा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. कंपनीने बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी आपल्या खात्यांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केला असल्याची माहिती फॉरेन्सिक ऑडिटमधून समोर आल्याचे पंजाब नॅशनल बँकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची माहिती बँकेने शेअर बाजारालाही दिली आहे. दरम्यान, हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात (एनसीएलटी) गेले आहे.
दरम्यान, यापूर्वीच शनिवारी डीआरटीने पीएनबीला दिलासा देत नीरव मोदीला पीएनबी आणि अन्य बँकांना व्याजासहित 7 हजार 200 कोटी रूपये देण्याचे आदेश दिले होते. नीरव मोदीने पीएनबी बँकेची 13 हजार 500 कोटींची फसवणूक केली होती. हा घोटाळा समोर येण्यापूर्वीच नीरव मोदीने देशाबाहेर पलायन केले होते. त्यानंतर सीबीआय आणि इडीने खटला दाखल करत त्याच्या कंपनीची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली होती. सध्या नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत.