संजयच्या पहिल्या मराठी सिनेमाचा टीझर

    दिनांक :08-Jul-2019
अनेक वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर अभिनेता संजय दत्तची पावले मराठी चित्रपटसृष्टीकडे वळली आहे. वडिलांकडून मिळालेला अभिनयाचा वारसा जपल्यानंतर संजय आता मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील त्याची पहिली निर्मिती असलेला ‘बाबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

 
 
काही दिवसापूर्वी संजयने ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या या आगामी चित्रपटाची माहिती दिली होती. हा चित्रपट संजयने त्याच्या वडीलांना सुनील दत्त यांना समर्पित केला असून या चित्रपटाची निर्मिती संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स अंतर्गत करण्यात येत आहे.
प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये वडील आणि मुलामधील नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या मुकबधीर मुलाला सामान्य मुलांप्रमाणे जीवन जगता यावा यासाठी हे वडील सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्याला शैक्षणिक शिक्षण देण्यासाठी, लहान लहान गोष्टींमधील आनंद मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात.
या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर. गुप्ता यांनी केले असून संजयने काही दिवसापूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच केले आहे. या पोस्टरमध्ये एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत सायकलवर बसलेला दिसून येत आहे. भावनेला भाषा नसते अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.