शरद पवारांची तिवरे धरण दुर्घटनास्थळाला भेट

    दिनांक :08-Jul-2019

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी तिवरे धरण दुर्घटना बाधित कुटुंबांची भेट घेतली. राज्यशासन व केंद्र शासनाकडून तिवरे धरण दुर्घटना बाधितांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

 
 
यावेळी राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ लाखाचा धनादेश देण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले तसेच ग्रामस्थांशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावापासून दूर पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी पवार यांच्याकडे केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्करराव जाधव, आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम आदींसह राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. तिवरे धरण फुटल्याने यामध्ये २४ जण बेपत्ता झाले होते त्यापैकी २० जणांचे मृतदेह आढळून आले आहेत तर अजूनही चार जणांचे मृतदेह सापडलेले नाहीत. धरण फुटीनंतर धरणाचे ठेकेदार शिवसेना आमदार सदानंद चव्हाण आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.