प्रकाश गेला...पण चौघांचे आयुष्य 'प्रकाश'मान करून; दोन किडन्या, लिवर, हृद दान

    दिनांक :08-Jul-2019
नागपुरात अलेक्सिस रुग्णालयात 2 जुलैला अपघात झालेले 38 वर्षीय प्रकाश ओमर यांना दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले.
वर्धा: आज विज्ञानाने प्रगती केल्यामुळे ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानाची संकल्पना समोर आली. यातून अनेकांना नवजीवन मिळू लागले आहे. वर्ध्याच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात एक जीवनदान देणारी शस्त्रक्रिया पार पडली आणि नागपुरात अपघातात ब्रेनडेड रुग्णाच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयाने चौघांना जीवनदान मिळाले. प्रकाश लक्ष्मणराव ओमर असे अवयवदान केलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे.


नागपुरात अलेक्सिस रुग्णालयात 2 जुलैला अपघात झालेले 38 वर्षीय प्रकाश ओमर यांना दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने प्रकाश ओमर यांच्या अवयवदानाने इतरांना जीवनदान मिळू शकते, अशी संकल्पना त्यांच्या कुटुंबीयांकडे माडली. कुटुंबीयांनी अवयवदानास होकार देताच पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. यामध्ये अवयवाची गरज असणाऱ्या लोकांची यादीतून निवड करण्यात आली.
त्यांचे हृदय मुंबईतील एकाला तर एक किडनी आणि पित्ताशय नागपूर येथील रुग्णांना दान करण्यात आले. यातील एक किडनी ही सावंगी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आली. दुसऱ्या जिल्ह्यातून किडनी आणून प्रत्यारोपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे अवयव सुरक्षितपणे नागपूर येथून आणण्यात आले. नागपूर येथील तज्ञ डॉ. कोलते यांचा प्रमुख उपस्थितीत डॉ. जय धर्मशी, डॉ. मनीष बलवानी, डॉ. अमित पसारी, डॉ. अमोल भावने, आणि विवेक चखोले यांनी किडनीच्या तीन तासांची शस्त्रक्रिया पूर्ण करत 29 वर्षांच्या रुग्णाला जीवनदान दिले.
 
आजवर या रुग्णालयात जवळपास अवयव प्रत्यारोपणाच्या 75 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. यापूर्वी रुग्णालयात ब्रेनडेड झालेल्या विदर्भातील पहिले 6 अवयवदान करणाऱ्यांचे ऑपरेशन डिसेंबर 2016मध्ये करण्यात आले होते. यात रुग्णाचे दोन डोळे, किडनी, पित्ताशय आणि विशेष म्हणजे यात पाहिल्यांदाच स्किन सुद्धा दान करण्यात आली होती. यानंतर ही तीन रूग्णांनी अवयवदान केले होते. यातून जवळपास 12 लोकांना जीवनदान मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी दिली.
अवयवदानाची प्रक्रिया -
रुग्ण ब्रेनडेड झाल्यानंतर वैद्यकीय समितीच्या पूर्ण निकषांची पूर्तता केली जाते. तसेच रुग्णाच्या नातलगांची इच्छा आणि परवानगी असेल तर रुग्णाचे अवयव गरजू रुग्णांकरीता पाठविण्यात येते. याची झेडटीसीसी समितीच्या माध्यमातून वैद्यकीय समितीच्या निकषांची पूर्ण पूर्तता केली जाते. यानंतर रुग्णाची यादीतून निवड केली जाते. मागील चार वर्षांत चार ब्रेनडेड रुग्णाचे अवयव सावंगी रुग्णालयातून पाठवण्यात आले. यावेळी प्रथमच बाहेर जिल्ह्यातून किडनी आणून प्रत्यारोपित करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
यासाठी सवांगी मेघे रुग्णालयाचे मुख कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, मुख्य वैदकीय अधीक्षक डॉ चंद्रशेखर महाकाळकर, अवयवदान समन्वयक रुपाली नाईक यांनी प्रक्रिया पार पडली. माणूस हा अमर होऊ शकत नाही, मात्र कर्तुत्वाने तो कायम स्मरणात राहून अमर होऊ शकतो. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मात्र ओमर कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाने प्रकाश कीर्तिरूपाने चार जणांचे आयुष्य प्रकाशमय करून अमर होऊन गेले.