युरेनियम समृद्धीकरण वाढविणार : इराण

    दिनांक :08-Jul-2019
- अणुकरार मोडण्याच्या दिशेने वाटचाल
- इराणचे अध्यक्ष व माईक पॉम्पिओ
तेहरान,
अमेरिकेसह प्रमुख देशांबरोबर केलेला अणुकरार मोडण्यासाठी इराणने आणखी एक पाऊल टाकले आहे. अणुकरारामध्ये नमूद केलेल्या युरेनियम समृद्धीकरणाचा स्तर आणखी वाढविणार असल्याची घोषणा इराण सरकारच्या वतीने रविवारी करण्यात आली.
 
 
 
दरम्यान, इराणने अणुकराराचा भंग करीत असल्याचे जाहीर केल्यानंतर, इराणवर आणखी निर्बंध लादले जाऊन इराणला एकटे पाडण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी आज सोमवारी दिला. इराणची घोषणा आणि अमेरिकेचा इशारा यामुळे आता, इराण आणि अमेरिकेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुकरारातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्यानंतर या तणावाला सुरुवात झाली. आखातामध्ये तेलवाहू जहाजांवरील हल्ले, अमेरिकेच्या युद्धनौकांची तैनाती आणि इराणने पाडलेले अमेरिकेचे ड्रोन यामुळे दोन्ही देशांमध्ये टोकाचा तणाव आहे.
 
या पृष्ठभूमीवर, अणुकरारातील अटींचा भंग करणार असल्याची घोषणा इराणने केली आहे. मात्र, नेमक्या किती दिवसांमध्ये आणि किती प्रमाणात युरेनियमचे समृद्धीकरण वाढविणार, ही गोष्ट जाहीर केलेली नाही. ही घोषणा करतानाच, युरोपीय देशांबरोबरील चर्चा सुरूच राहील आणि नियोजित मंत्रिस्तरावरील चर्चा या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होईल, असे इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद झरीफ यांनी सांगितले. या प्रतिपादनामधून अखेरच्या क्षणापर्यंत अणुकरार वाचविण्याचा पर्याय इराणने खुला ठेवल्याचे काही राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगही बारवाईने लक्ष ठेऊन आहे.
 
दरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. इराण आणि पाश्चिमात्य देशांबरोबरील चर्चा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असून, 15 जुलैपर्यंत तोडगा निघेल, अशी आशा मॅक्रॉन यांनी या चर्चेनंतर व्यक्त केली.
 
युरेनियममध्ये प्रामुख्याने युरेनियम-238 या समस्थानिकांचे (आयसोटोप्स) प्रमाण 99 टक्क्यांपर्यंत असते. अणुबॉम्बसाठी किरणोत्सार करण्याची क्षमता असणार्‍या युरेनियम-235ची गरज असते. इराणसोबतच्या अणुकरारामध्ये युरेनियम समृद्धीकरणाचे प्रमाण 3.67 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याची प्रमुख अट होती.