दहेंडा गावात डायरियाचा कहर; ६० जणांना लागण

    दिनांक :09-Jul-2019
धारणी, 
धारणी जवळच्या दहेंडा गावातील विहिरीचे पाणी दूषित झाल्याने सुमारे 60 जणांना डायरियाची लागण झाल्याने गावात एकच दहशत पसरलेली आहे. कळमखार प्रा.आ.केंद्राकडून आदिवासी समाज भवनात कॅम्प लावून स्थिती नियंत्रणात करण्यात आलेली आहे.
धारणी पासून अवघ्या 6 कि.मी.अंतरावरील दहेंडा गावात मागील दोन दिवसात लहान मोठ्या साठ जणांना उल्टी व हगवण लागलेली आहे. गावातील एका विहिरीचे दुषित पाणी प्याल्याने एकाच भागातील लोकांना डायरियाने आपल्या प्रभावात घेतलेले आहे. कळमखार प्रा.आ.केंद्राच्या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या एका पथकाद्वारे गावातील समाज मंदिरात विशेष कॅम्प लावून सर्वांवर उपचार करण्यात आल्याने आता स्थिती आटोक्यात आलेली आहे.
 

 
 
गावातील आदिवासींनी दिलेल्या माहितीप्रमाणे गावालगतच्या एका शेताजवळच्या विहिरीत सांडपाणी पाझरत असल्याने या विहिरीचे पाणी दुषित झालेले आहे. विहिरीतील पाण्याविषयी ग्रामसेवकाल माहिती नव्हती. सोमवारी जेव्हा लोकांना कॅम्पमध्ये आदिवासी लोकांना भरती करण्यात आले. तेव्हा सचिवाने घाई गडबडीत व शास्त्रीय प्रक्रिया न करताच विहिरीतील पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून दिले. माहितीनुसार गावातील पाणीपुरवठा योजना नेहमी बंद चालू स्थितीत राहत असल्याने आदिवासींना विहिरीतील पाणी उपसून प्यावे लागत असते. एकदा पावसाळा सुरू झाला की धारणी व चिखलदरा तालुक्यातील अनेक गावात दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत असते.
दहेंडाचे रहिवाशी अनिल मावस्कर तथा बाबा मावस्कर यांना डायरिया झाल्यावर सध्या प्रकृती धोक्याबाहेर आहे. आरोग्य विभागाची देखरेख व उपचार सुरू असून नागरिकांना स्वच्छतेविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत. सचिवाच्या दुर्लक्षामुळे गावात डायरियाची साथ पसरली, असा आरोप ग्रामस्थांनी लावलेला आहे.