CWC2019 : भारत, न्यूझीलंड उपांत्य सामना आज

    दिनांक :09-Jul-2019
मॅन्चेस्टर, 
यंदा विश्वचषक जिंकायचाच आहे, हे विराट कोहली आणि त्याच्या चमूचे स्वप्न आहे आणि संपूर्ण दोन दिवस उपांत्य सामन्याचे वातावरण तापलेले आहे. मंगळवारी मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियमवर विश्वविजेतेपदाचे दोन प्रबळ दावेदार भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळला जाणार आहे. 
 
 
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज रोहित शर्मासह भारताची फलंदाजीची अव्वल फळी मजबूत असली तरी न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाजसुद्धा आक्रमक मारा करण्यास सज्ज असेल. दोन्ही संघ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे हा सामना निश्चितच चुरशीचा होईल, या सामन्यात रोहित लॉकी फर्ग्युसनच्या उसळच्या चेंडूवर हुक मारण्याचा प्रयत्न करताना, तसेच लोकेश राहुल ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीचा समाचार घेताना तसेच कोहली मॅट हेनरीच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी करताना तसेच केन विल्यम्सनची फिरकीविरुद्ध खेळण्याचे अचूक तंत्र आणि रॉस टेलरचा जसप्रीत बुमराहला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न बघायला मिळेल. शिवाय महेंद्रिंसह धोनी डावखुरा फिरकीपटू मिचेल सॅण्टनरच्या गोलंदाजीत धावा काढेल की नाही, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या नेट सरावात धोनीने सॅण्टनरची गोलंदाजी जवळून बघितली आहे.
  
भारतासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे न्यूझीलंडची स्पर्धेच्या अखेरच्या तीन सामन्यात झालेली घसरगुंडी, परंतु स्पर्धेच्या प्रारंभी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर त्यांनी पाकिस्तानवर मात करून गुणतालिकेत अव्वल 4 मध्ये स्थान मिळविले. परंतु भारताला एवढीच गोष्ट पुरेशी ठरू शकत नाही. रोहित (647), लोकेश राहुल (360) व विराट कोहली (442) यांनी एकूण 1347 धावांचे योगदान दिले आणि त्यांची गाठ फर्ग्युसन (17 बळी), ट्रेंट बोल्ट (15 बळी) व मॅट हेनरी (10 बळी) यांच्याशी पडणार आहे. या सर्व गोलंदाजांनी एकूण 42 बळी टिपलेले आहेत. जिमी निशाम (11 बळी) व कॉलिन डी ग‘ॅण्डहोम (5बळी) यांनाही विसरून चालणार नाही. या वेगवान गोलंदाजांसह न्यूझीलंडने एकूण 58 बळींची नोंद केली आहे. हार्दिक पांड्या व महेंद्रिंसह धोनीसह मधल्या फळीचा आत्मविश्वास हवा तसा वाढला नाही. पांड्याने काही झटपट धावा काढल्या व बळीसुद्धा मिळविल्या, परंतु आता न्यूझीलंडविरुद्ध त्याच्याकडून अधिक भरीव कामगिरीची आशा आहे. धोनीवर टीका होत असली तरी त्याने तिनशेच्या जवळपास धावांचे योगदान दिलेले आहेत. अर्थात फलंदाजीच्या तुलनेत भारताला तोड नाही.
 
भारतीय गोलंदाजीत बुमराह व मोहम्मद शमी चांगल्या फॉर्मात आहेत. अखेरच्या साखळी सामन्यात कोहलीने युजवेंद्र चहलला खेळविले नव्हते. चहलला दुखापतीची समस्या आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. रवींद्र जडेजाला एका सामन्यात संधी मिळाली व त्याने छाप सोडली. त्याचाही या सामन्यासाठी विचार होऊ शकतो. या सामन्यात जर भारत भुवनेश्वर कुमारसह तीन वेगवान गोलंदाजांसह खेळला, तर पुन्हा एकदा मधल्या फळीत केदार जाधवला संधी मिळू शकते.
 
1983च्या विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य सामना रंगला होता आणि आता 11 जुलै रोजी बर्मिंगहम येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे.