नवनीत राणा यांच्या खासदारकीला आव्हान; उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल

    दिनांक :09-Jul-2019
अमरावती, 
नवनीत रवी राणा यांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या विजयाला आव्हान देणार्‍या दोन निवडणुक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाल्या आहे.
 
 
माजी खासदार आनंदराव अडसुळ व त्यांचे स्विय सहाय्यक सुनील भालेराव यांनी या याचिका दाखल केल्या आहे. मुळात पंजाब येथील ‘लुभाणा’ जातीच्या असणार्‍या नवनीत राणा यांनी मागासवर्गीयांसाठी राखीव असणार्‍या अमरावती मतदार संघात निवडणूक लढवून पात्र मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय केल्याचे याचिकेत म्हटले आहे. नवनीत राणा यांनी नौकरीच्या कारणासाठी काढलेले मोची जातीचे प्रमाणपत्र लोकसभा निवडणूक अर्जाला जोडून निवडणूक लढविली. त्या विरोधात आनंदराव अडसूळ यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पंजाब सरकारच्या महसूल सचिवांनी केंद्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर केलेल्या नवनीत राणा यांच्या लुभाणा जातीच्या कागदपत्रांसह आनंदराव अडसूळ यांचे वकील सचिन थोरात आणि सुनील भालेराव यांचे वकील राघव कवीमंडण यांनी दोन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केल्या आहेत. याचिकेत अन्य काही मुद्देही त्यांनी उपस्थित केले आहे. आनंदराव अडसूळ गेल्या सहा वर्षांपासून नवनीत राणा यांच्या जात प्रकरणावरून न्यायालयीन लढाई लढत आहेत. आता पुन्हा त्यांनी नव्याने उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात नेमके तथ्य काय, हे आता न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.