शेतात फवारणी करताना दोघांना विषबाधा

    दिनांक :09-Jul-2019
अकोला,
शेतात फवारणी करताना दोन शेतकर्‍यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या विषबाधेतील एक शेतकरी वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा वाकी येथील, तर दुसरा शेतकरीअकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथील रहिवासी आहे. दोन्ही शेतकजयांवर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे.
 
 
 
जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील नया अंदुरा येथील शेतकरी तेजराव दादाराव तायडे हे सोमवार 8 जुलै रोजी सकाळी शेतात फवारणी करत असताना त्यांना श्वसनाद्वारे विषबाधा झाली. त्यानंतर त्यांना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर रविवार 7 जुलै रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाघोडा वाकी येथील शेतकरी अतिष राठोड हे शेतात किटकनाशकाची फवारणी करत असताना श्वसनामार्फत त्यांना विषबाधा झाली. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. दोन्ही रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये उपचार सुरू असून, दोघांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.