World Cup 2019: पावसामुळे सामना खोळंबला

    दिनांक :09-Jul-2019
  न्यूझीलंड विरुद्ध भारत सामना पावसामुळे खोळंबला आहे.  ४६.१ षटकानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. सद्याची परिस्थिती पाहता लगेचच पाऊस थांबेल असे चिन्ह नसल्याने काही काळ वाट पाहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आता पर्यंतच्या सामन्यात कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. 
 
 
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय काहीसा फसला. सलामीवीर मार्टीन गप्टील अवघ्या एका धावेवर माघारी परतला. जसप्रीतच बुमरहाने त्याचा बळी घेतला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि हेन्री निकोलस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जाडेजाने हेन्री निकोलसचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली. यानंतर मैदानात आलेल्या अनुभवी रॉस टेलरने कर्णधार विल्यमसनच्या साथीने न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. कर्णधार विल्यमसनने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकही झळकावलं. मात्र चहलच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाकडे झेल देत तो माघारी परतला. त्याने ६७ धावांची खेळी केली.
विल्यमसन माघारी परतल्यानंतर रॉस टेलरने डावाची सुत्र आपल्या हातात घेतली. जिमी निशम आणि कॉलिन डी-ग्रँडहोमही झटपट माघारी परतले. मात्र टेलरने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं. पावसामुळे खेळ थांबवला गेला तेव्हा टेलर नाबाद ६७ धावांवर खेळत होता.