भाजपाचा अमरावती जिल्हा परिषदेवर हल्लाबोल

    दिनांक :09-Jul-2019
अमरावती,
जिल्हा परिषदेची सत्ता सांभाळणार्‍या काँग्रेसच्या नियोजनशुन्य कारभारामुळे केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी पाठविलेले एकूण 116 कोटी परत गेल्याचा आरोप करून भाजपाने सोमवारी दूपारी जिल्हा परिषदेवर हल्लाबोल करून जाब विचारला. त्यामुळे वातावरण तणावपुर्ण झाले होते.
 

 
 
भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे व गटनेता प्रवीण तायडे व शेकडो कार्यकर्ते दूपारी मुख्यकार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांच्या दालनात धडकले. सुरूवातीला शिराळा आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे दगावलेल्या संगिता आखरे यांना तातडीने मोबदला देण्यात यावा आणि येथील कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर ठोस आश्वासन भाजपाला मिळाले. त्यानंतर ग्रामीण भागातल्या पांदण रस्ते निधी असतानाही होऊ न देणार्‍या सत्ताधार्‍यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. त्यावर खत्री यांनी पांदण रस्त्या संदर्भातली वस्तुस्थिती लेखी स्वरूपात देण्याचे मान्य केले. 2016-17 मध्ये 96 कोटी, 2018-2019 मध्ये 15 कोटी व जनसुविधा योजनेचे 5 कोटी असे 116 कोटी निधी परत गेला आहे. सत्ताधार्‍यांनी जाणिवपूर्वक हे कृत्य केले असून ग्रामीण जनतेला विकासापासून दूर ठेवले आहे. सर्व माहिती हे लेखी स्वरूपात देण्याची व संबधितांवर कारवाईची मागणी भाजपाने केली. खत्री यांनी ती मान्य केली. जिल्हा परिषदेतल्या सत्ताधार्‍यांच्या मनमानीमुळे ग्रामीण भागातला विकास खुंटला असल्याचा आरोप करून भाजपाने काँग्रेसचे आमदार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना घेऊन अधिकार्‍यांसमवेत आपल्या घरी बैठका घेतात. नियमानुसार अशा बैठका घेता येत नसतानाही अधिकारी व कर्मचार्‍यांना नाहक त्रास देण्याचे काम सत्ताधारी करीत आहे. अशा बैठकी रद्द कराव्या व दोषींवर कारवाईची मागणी भाजपाने केली. जनतेच्या हिताचे अन्यकाही मुद्दे यावेळी उपस्थित झाले. सीईओ खत्री यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. यावेळी सरचिटणीस जयंत आमले, सुभाष श्रीखंडे, अप्पा पाटील, दिनेश चव्हाण, मिलींद बांबल, मुकेश कठाळे, तात्या मेश्राम, नरसिंग बंग, विलास राठोड यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांचाही बंदोबस्त होता.