निसर्गसौंदर्याने नटलेले 'कौसानी'

    दिनांक :09-Jul-2019
डॉ. उदय राजहंस
9049605808
 
निसर्गाच्या कोंदणात एखादा अनमोल हीरा असावा, असं हे कौसानी गाव! निसर्गाने सौंदर्याची लयलूट केली आहे इथे.
 
रानीखेतच्या उत्तरेला साधारण 80 कि.मी. आणि समुद्रसपाटीपासून साधारण 1800 मीटर्स उंचीवर असणारं एक छोटंसं गाव. रानीखेतहून अल्मांडा मार्गे (हेही एक सुंदर ठिकाण) कौसानीला येतानाचा रस्ता, घाट म्हणजे निसर्गाची नुसती उधळण. हिरवेकंच पाईन, देवदारची झाडं आणि त्यात गडद लाल रंगांनी बहरलेलं होडोडेंट्रानच्या झाडांचं मिनी जंगल. अतिशय विहंगम दृश्य आहे हे.
 

 
 
कौसानीला फक्त निसर्गसौंदर्यासाठी जाण्याबरोबर अजून दोन महत्त्वाची स्थळं बघायला जायलाच हवं- 1) महात्मा गांधींचा अनासक्ती आश्रम आणि 2) प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि कवी सुमित्रानंदन पंत यांचे जन्मस्थान. दोन्ही व्यक्ती भारतभूला वंदनीय अशाच आहेत.
 
अनासक्ती आश्रम कसा स्थापन झाला?
सन 1928 च्या जून महिन्यात गांधीजी भारतभ्रमणासाठी निघाले असताना, कौसानीला त्यांच्या एका स्नेह्याकडे दोन दिवसांसाठी म्हणून आले. तिथून त्यांना हिमालयाचे उत्तुंग आणि विहंगम दर्शन झाले आणि त्यांचा मुक्काम जवळपास 15 दिवस झाला. इथेच त्यांनी गीतेवर आधारित ‘अनासक्ती योग’ या विषयावर पुस्तक लिहिले. त्यातील विचार जगात पसरले. या जागेला नंतर आश्रमात परिवर्तित केलं गेलं. सध्या सरकारी व्यवस्थेमध्ये आश्रम बघितला जातो. इतकं सृष्टिसौंदर्य आपल्याकडेच असताना स्वित्झर्लंडला कशाला जायला हवं?
 
अनासक्त योग
गांधीजींच्या शब्दांत- ‘‘शत्रू-मित्र, मान-अपमान, सुखदु:ख इन सबके विषयमे जो समता धारण करता है, निंदा और स्तुती मे एकसा रहता है जो स्थिर चित्तवान है, जिसने आसक्ति छोड दी है, वह दक्ष ही अनासक्त योगी है.’’
 
कौसानीचे आमचे दुसरे आकर्षण म्हणजे, थोर हिंदी साहित्यिक आणि कवी पं. सुमित्रानंदन पंत यांचे जन्मस्थान. मराठी मनाला पु. ल. वा वि. स. खांडेकर तसे हिंदी मनाला पं. सुमित्रानंदन पंत. इथे त्यांचे जुने घर जतन करून ठेवलेले आहे. त्यांचा स्वत: लिहिलेला तसेच वाचलेला पुस्तकसंग्रह बघण्यासारखा आहे. खूप जुने फोटो, कपडे, लिखाणसाहित्य मन मोहून घेतं. त्यातील एक फोटो अविस्मरणीय असा आहे.
 
त्या फोटोत अशा व्यक्ती आहेत की अवाक्‌ व्हावं! पं. सुमित्रानंदन पंत यांच्यासह हरिवंशराय बच्चन, तेजी बच्चन, देविकाराणी आणि 10 वर्षांचा स्मार्ट मुलगा- अमिताभ बच्चन! या फोटोवरून आमच्या मार्गदर्शकाने सांगितलेली कहाणी शेअर करावीशी वाटते. बघा- सुमित्रनंदन पंत यांचा जन्म झाल्याबरोबर 6 दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यांचे पालनपोषण त्यांच्या आत्याने केले. (आत्याच्या नावावरून ते स्वत:ला ‘सुमित्रानंदन’ म्हणवू लागले.)
 
वडिलांची बदलीची नोकरी होती. अनेक ठिकाणी बदली होत असताना, डेहराडूनच्या बाजूला असताना त्यांची बच्चन कुटुंबाशी जवळीक वाढली. हरिवंशराय बच्चन त्यांचे मित्र झाले. अनेक कविसंमेलनांना त्यांची हजेरी असे. या दरम्यान 1942 सालचे भारत छोडो आंदोलन जोरात होते. 9 जुलैला खूप मोठे आंदोलन म. गांधींच्या नेतृत्वाखाली झाले. त्यात हे सगळे जण सामील झाले. विशेष गोष्ट म्हणजे तेजी बच्चन या त्या वेळी गरोदर असतानाही स्वातंत्र्यसंग्रामाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत्या झाल्या.
 
‘इन्कलाब जिंदाबाद’च्या नार्‍याने सारा हिंदुस्थान हादरून गेला. त्यानंतर 11 ऑक्टोबरला त्या बाळंत होऊन मुलगा झाला. त्या वातावरणाचा परिणाम म्हणून बच्चन जोडप्याने त्याचे नाव ‘इन्कलाब’ ठेवले. पण, शाळेत नाव टाकताना पं. सुमित्रानंदन पंतांनी बच्चन कुटुंबीयांना इन्कलाब हे नाव बदलवण्याचे सुचविले; आणि त्यानुसार आणि त्यांच्या सल्ल्यानेच त्या मुलाचे नवे नाव ‘अमिताभ’ ठेवण्यात आले. तेच हे आजचे महानायक अमिताभ बच्चन! खूपच अप्रूप वाटले ही कहाणी ऐकून.
 
असे हे कौसानी गाव! हिमालयाच्या कुशीत, जवळच रुद्रेश्वर महादेव आणि धबधबे, गोमती नदीकाठचे बैजेश्वर, 10 व्या शतकातील मंदिरसमूह; तर गोमती व शरयू नदीच्या संगमावरील बागेश्वराचे अतिपुरातन मंदिर, सोमेश्वर देवालय, हेही जरूर बघावेत असे आहेत. पुरातत्त्व विभागाने संरक्षित ही आपल्या देशाची मौल्यवान ठेव आहे.
 
टी गार्डन, वुलन शाल फॅक्टरी या गोष्टी वेळ असल्यास जरूर बघाव्यात. सूर्योदयाचा आनंद, बर्फाच्छादित हिमशिखरं कय्यूर व्हॅलीत जरूर बघावीत. डोळ्यांचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. असे कौसानी हे छोटंसं गाव, एवढ्या मोठ्या हिमालयात आपली आब राखून आहे...
 
 
 
 
•