धाडसी चोरीत साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास!

    दिनांक :09-Jul-2019
वाशीम, 
ग्रामीण पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या कोकलगाव येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून अज्ञात चोरांनी सोने-चांदीच्या दागिण्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध 8 जुलै रोजी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.
 

 
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविशंकर सिताराम काळबांडे (कोकलगाव) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की ते त्यांच्या कुटूंबातील सदस्यांसमवेत घरातील एका खोलीत झोपलेले असताना चोरांनी शिताफिने दुसर्‍या खोलीच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्या खोलीतून साडेतीन तोळे सोने (किंमत 1 लाख 20 हजार) तसेच 2 लाख 19 हजार 500 रुपये रोख आणि घरासमोर उभी करून असलेली मोटार सायकल (किंमत 25 हजार रुपये) यासह अन्य असा एकूण 3 लाख 56 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांविरूद्ध भादंविचे कलम 457,380 अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करित आहेत.