देशभरात सीबीआयची ११० ठिकाणी छापेमारी

    दिनांक :09-Jul-2019
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज देशव्यापी मोहीम राबवत १९ राज्यांसह केंद्र शासित प्रदेशातील ११० ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीदरम्यान सीबीआयने भ्रष्टाचार, गुन्हेगारी गैरवर्तन व शस्त्र तस्करी इत्यादींशी संबंधित ३० स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.
 
 
छापेमारी सुरू असल्याने याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. कदाचित ही छापेमारी दिवसभरही चालू शकते, असे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे. सीबीआयची आठवडाभरातील ही दुसरी मोठी छापेमारी आहे. बँकांची फसवणुक करणाऱ्यांविरोधातही सीबीआयकडून अशाचप्रकारची छापेमारी मागिल मंगळवारी करण्यात आली होती.
 
 
सीबीआयकडून आज दिल्ली, मुंबई, पुणे, गोवा, चंडीगड, जम्मू , श्रीनगर, जयपूर, कानपूर, रायपूर. हैदराबाद, कोलकाता, रांची, मदुराई, रूरकेला, बोकारो आणि लखनऊ याशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, ओदिशा, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व बिहार आदी राज्यांमधील विविध ठिकाणी देखील छापेमारी सुरू आहे.