अमरावतीत भररस्त्यात महाविद्यालयीन तरूणीची हत्या

    दिनांक :09-Jul-2019
युवकाने चाकूने केले सपासप वार
अमरावती,
भातकुली तालुक्यातल्या कवठा बहाळे येथे राहणार्‍या महाविद्यालयीन युवतीची अमरावती शहरातल्या भररस्त्यावर एका युवकाने चाकूने भोसकून हत्या केल्याची थरारक घटना घडली. मंगळवारी 9 जुलै रोजी दुपारी तीन वाजताचे सुमारास स्थानीक चुनाभट्टी परिसरातल्या गोपालप्रभा मंगल कार्यालयासमोर ही घटना घडली. हत्या करणार्‍या युवकाला नागरिकांनी लगेच पकडले व चांगला जोप देऊन पोलिसांच्या स्वाधिन केले.
 
 
 
अर्पिता दत्ता ठाकरे असे मृतक युवतीचे नाव आहे. तुषार किरण मसकरे असे आरोपी युवकाचे नाव आहे. अर्पिता शहरातील भारतीय महाविद्यालयात बी.कॉम. प्रथम वर्षाला शिकत होती. मंगळवारी दुपारी अडीच वाजताचे सुमारास ती तिच्या मैत्रीणीसोबत राजापेठ जवळील गोपालप्रभा मंगल कार्यालयानजीकच्या शाह कोचींग क्लासेस येथे शिकवणी वर्गाला गेली होती. परत येत असताना वेष बदलवून आलेल्या तुषार मसकरे याने तिला रस्त्यात गाठले. बाचाबाची केल्यावर अचानक त्याने चायना चाकूने तिच्या पोट, मान व गळयावर सपासप वार केले. यावेळी तिच्या मैत्रीणीने अर्पिता हीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने अर्पिताच्या मैत्रीणीवर देखील हल्ला केला. यात तिच्या हाताला गंभीर जखम झाली. त्यानंतर हल्लेखोर तुषार पळत सुटला. परिसरातील नागरिक त्याच्या मागे धावले. दरम्यान काही नागरिकांनी जखमी अर्पिताला ऑटोतून जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. परंतु, गंभीर जखमी झालेल्या अर्पिता हीचा मृत्यु झाला होता. दूसरीकडे नागरिकांनी तुषारला पकडले व त्याला चांगलाच चोप दिला. त्यात तो जखमी झाला. राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.