राजीनामा देणार्‍या आमदारांना अपात्र ठरवा

    दिनांक :09-Jul-2019
- काँग्रेसची मागणी
- सरकार वाचविण्यासाठी शेवटची धडपड
बंगळुरू,
कर्नाटकात निर्माण झालेला राजकीय पेच आज तिसर्‍या दिवशीही कायमच आहे. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जदएस-काँग्रेस आघाडीचे सरकार वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न करताना, आमदारकीचा राजीनामा देणार्‍या आपल्या 10 बंडखोर सदस्यांना अपात्र ठरविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
 

 
 
आपल्याच पक्षाची अशी अडचण करू नका, राजीनामे मागे घ्या आणि पक्षात परत या, असे आवाहन करताना, पक्षाच्या शिस्तीचे पालन न करणार्‍या आमदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला आहे. जदएसच्या तीन आणि काँग्रेसच्या 10 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले.
 
दरम्यान, आजच्या बैठकीतही काही आमदार अनुपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या आमदारांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी ते पक्षाच्याच पाठीशी आहेत, अशा आशयाचे पत्र त्यांच्याकडून प्राप्त करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्नाटक आणि इतर भाजपेतर राज्यांमधील सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आमचे सरकार पाडण्याचा भाजपाचा हा सहावा प्रयत्न आहे आणि यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाच हात आहे, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.
रोशन बेग यांचाही राजीनामा
पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित करण्यात आलेले कॉंगे्रसचे आमदार रोशन बेग यांनीही आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. हा काँग्रेससाठी आणखी एक हादरा मानला जात आहे. राजीनामा देणार्‍या अन्य आमदारांनी ज्याप्रमाणे मुंबई गाठली, तसे मी काहीच करणार नाही. मी येथेच राहणार आहे. राज्य हज समितीचा अध्यक्ष या नात्याने मी हज यात्रेकरूंच्या व्यवस्थेसाठी आता विमानतळावर जात आहे, असे त्यांनी सांगितले. राजीनामा देणारे आमदार तुमच्याशी काही बोलले का, असे विचारले असता, होय त्यांनी मला हॅलो म्हटले, असे गमतीचे उत्तर त्यांनी दिले.
 
माझे प्रत्येक पाऊल ऐतिहासिक असेल : विधानसभाध्यक्ष
कर्नाटकातील राजकीय पेच सोडविण्यासाठी मी उचलणार असलेले प्रत्येक पाऊल ऐतिहासिक असेल, मी कोणतीही चूक करणार नाही, अशी भूमिका राज्य विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश यांनी विशद केली.