तबरेज अन्सारीबाबत टिकटॉकवर वादग्रस्त व्हिडिओ

    दिनांक :09-Jul-2019
- सायबर सेलकडून गुन्हा दाखल 
सोशल मीडियाचा सामान्यांवरील प्रभाव अधिकाधिक वाढतच आहे. त्यातून लोक याचा दुरुपयोगही मोठ्या प्रमाणावर करीत असल्याचे कुठल्या ना कुठल्या घटनांमधून समोर येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे ती म्हणजे झारंखडमध्ये झुंडीच्या मारहाणीचा बळी ठरलेला तबरेज अन्सारी याच्या मृत्यूचा बदला घेण्याची भाषा करणारा एक व्हिडिओ. टिकटॉकवर हा वादग्रस्त व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. याची गंभीर दखल मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने घेतली असून हा व्हिडिओ तयार करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
मोबाईलच्या आहारी गेलेल्यांमध्ये टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्याची क्रेझ आहे. प्रसिद्धीसाठी अनेकजण यामार्फत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यापासूनही स्वतःला रोखू शकत नाहीत. मात्र, या गोष्टी अंगलट येऊ शकतात हेच या ताज्या व्हिडिओवरुन समोर आले आहे.
 
 
‘तबरेजला तर तुम्ही मारुन टाकलंत मात्र भविष्यात त्याचा मुलगा याचा बदला घेऊ शकतो’ अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर या टिकटॉकच्या व्हिडिओत असल्याने याची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या युजरने आपल्या काही मित्रांसोबत हा व्हिडिओ तयार केला आहे. हे सर्वजण तबरेज अन्सारीच्या समर्थनार्थ आक्षेपार्ह चर्चा करीत आहेत. हा व्हडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. याप्रकरणी सायबर सेलने १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार करणाऱ्या रमेश सोलंकी यांनी सांगितले की, माझ्या तक्रारीनंतर टिटकॉकने हा वादग्रस्त व्हिडिओ हटवला आहे. तसेच हा व्हिडिओ तयार करणाऱ्या तिघांचे अकाऊंटही सस्पेंड करण्यात आले आहेत. त्यामुळे या युजर्सना पुन्हा आपल्या अकाऊंटवरुन कोणतीही पोस्ट करता येणार नाही.