पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती, अण्णा हजारे

    दिनांक :09-Jul-2019
मुंबई,
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सरकारी साक्षीदार म्हणून मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात दाखल झाले होते.  पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती अशी साक्ष ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात दिली आहे. पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे नातेवाईक आहेत त्यामुळे माझ्या तक्रारीची कुणीही दखल घेत नाही. मला मिळालेल्या धमकीबाबत मी मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांना दाद मागितली होती असेही ते म्हणाले.  तेरणा साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात अनेक पुरावे सादर केले होते. तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. याचा निषेध म्हणून मी पद्मश्री, वृक्षमित्र हे पुरस्कारही परत केले. मात्र कशाचाही उपयोग झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून मी उपोषणाला बसलो, त्यानंतर सरकारने पी. बी. सावंत आयोगाकडे भ्रष्टाचाराची चौकशी सोपवण्यात आली.

 
 
या चौकशीत पद्मसिंह पाटील दोषी ठरल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. याच गोष्टीचा राग मनात ठेवून पद्मसिंह पाटील यांनी मला जिवे मारण्यासाठी सुपारी दिली होती असाही आरोप अण्णा हजारे यांनी केला. मी तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दबावही टाकण्यात आला होता. एकदा माझ्या कार्यालयात येऊन पद्मसिंह पाटील यांच्या माणसांनी माझ्या कार्यकर्त्याकडे कोरा चेक सोपवला, आणि हवी ती रक्कम टाका अशी ऑफर मला देण्यात आली असंही अण्णा हजारे यांनी कोर्टात सांगितले आहे.