खातेधारकाच्या परवानगीशिवाय खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत

    दिनांक :09-Jul-2019
नवी दिल्ली,
बँक खातेधारकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी केंद्र सरकार एक नवीन योजना तयार करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यासंबंधीची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात केली होती. त्यावेळी निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते की, दुसरीकडून बँक खात्यात जमा होणाऱ्या पैशांवर नियंत्रण आणण्यात येणार आहे. सध्याची बँकांची स्थिती सुधारण्यासाठी तसेच अकाउंट होल्डर्स मजबूत करण्यासाठी सरकार पाऊले उचलणार आहे.
 
 
दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्यात त्याच्या परवानगीशिवाय किंवा माहितीशिवाय पैसे जमा होतात. फक्त पैसे जमा करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा बँक खाते नंबर माहीत असला पाहिजे. कॅश डिपॉजिट मशीनच्या माध्यमातून कोणत्याही बँक खातेधारकाच्या खात्यात 12 अंकांचा खाते नंबर टाकून पैसे जमा होतात. तसेच, बँक शाखेत एक पावती भरुन पैसे जमा होतात. काही बँका नॉन-होम ब्रांचमध्ये बचत खात्यात पैसे जमा करण्यावर शुल्क आकारतात. मात्र, आता प्रस्तावित बदलांसह खातेधारकांना आपल्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आधी परवानगी द्यावी लागणार आहे.
नोटाबंदीच्यावेळी अनेक व्यक्तींच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. खातेधारकांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या माहितीशिवाय त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. विशेष म्हणजे, जन धन खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. त्यामुळे अनेक खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागला होता.
जाणकारांच्या मते, यामध्ये बदल होणे गरजेचे होते. कारण, असा प्रकारच्या ठेवी खातेधारकांच्या उत्पनाच्या दृष्टीने पाहिले तर त्याच्या करात वाढ होऊ शकते. दरम्यान, सध्या अशा प्रकारची कोणतीही बँकिंग योजना लागू करण्यात आलेली नाही. यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. तसेच, बँकिंग रेग्युलेटर काय पाऊले उचणार, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.