तरुणांचा आनंदोत्सव- मैत्री दिन !!

    दिनांक :01-Aug-2019
सर्वेश फडणवीस
 
आज आपण 21 व्या शतकात यशस्वी वाटचाल करतो आहोत. हे ‘यंत्र युग’ मानले जाते. आजच्या युगात तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. असे असले तरी आजच्या युगातही नाते-संबंधांनाही तितकेच महत्त्व आहे आणि हेच नातेसंबंध जपणारे हक्काचे जीवाभावाचे नाते म्हणजे मैत्री.
 
ऑगस्ट महिना उजाडला की वेध लागतात ते ‘फ्रेंडशिप डे’ म्हणजे ‘मैत्री दिन’ साजरा करण्याचे. या महिन्यात पहिल्या रविवारी येणारा हा दिवस म्हणजे तरुणांचा जणू उत्सवच असतो. कॉलेजमधील उत्साहाच्या वातावरणात अजून भर टाकणारा हा दिवस वातावरणचं बदलून टाकतो. मग ऑगस्टचा पहिला आठवडा हा मैत्रीच्या आनंदी नात्यामध्ये सर्वांना गुरफटवून टाकणारा जातो. 

 
 
जुलै किंवा ऑगस्टमध्ये काही जणांचे कॉलेज नुकतेच सुरू झालेले असते, त्यामुळे नव्या मित्रांना-मैत्रिणींना जाणून घ्यायची ओढ असते. ऑगस्टच्या पहिल्याच रविवारी जागतिक मैत्री दिवस साजरा केला जातो. यावर्षीही तरुणाई जोरदार उत्साहात हा दिवस साजरा करण्यासाठी सज्ज आहे. काही जणांसाठी तर हा पूर्ण आठवडाच मैत्रीपूर्ण असा असतो. ग्रुपसोबत गंमतीजमती करण्यासाठी राखून ठेवलेला वेळ फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने उपयोगी येतो.
 
 
आपल्या आवडत्या मित्रांना, वेळोवेळी मदत केलेल्या लोकांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या हातावर मैत्रीची खूण असावी म्हणून फ्रेंडशिप बॅण्ड बांधले जातात. हा मैत्री दिन साजरा करण्यासाठी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तरुणाईची जोरदार खरेदी सुरू होते. फिरायला जायचे प्लान ठरवले जातात, पार्टीची आखणी केली जाते. काही ग्रुप्स मोठी सुटी दूरवर फिरायला जातात. हाच एक दिवस असतो, आपल्या मित्रांचा आदर करण्याचा, त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याचा. संपूर्ण वर्षभरात केलेल्या उपकारांची परतफेड करण्याचा. कळत नकळत झालेली मैत्री कधी बहरत जाते हे समजतच नाही. मग त्यातून निर्माण होतं ते जिव्हाळ्याचं नातं.
 
मैत्री म्हणजे मजामस्ती, हसणे, खिदळणे आणि शेवटपर्यंत साथ देणे. अडचणीच्या वेळी कोणी आले नाही तरी मित्रमैत्रिणी नक्कीच येतात. आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात पण दीर्घकाळ टिकणारं, कधीही न तुटणारं असं नातं म्हणजे मैत्रीचे. जे विश्वास आणि मदतीच्या आधारावर टिकलेले असते. मैत्रीत ना वर्णभेद असतो ना िंलगभेद. मैत्री ही लहानांपासून ते अगदी आबाल वृद्धांपर्यंत कोणाशीही असू शकते.
 
आजकाल फ्रेंडशिप डे सोशल मीडियावरही साजरा केला जातो. आपल्या सगळ्या मित्रांचे फोटो एकत्र करून त्याचा कोलाज तयार करून तो सोशल मीडियावर टाकून छानसं कृतज्ञतापूर्ण स्टेटस ठेऊन त्या मित्राला ती पोस्ट टॅग करून त्याच्याबद्दलची आपुलकी दाखवली जाते. काहींच्या मते मैत्री ही दाखविण्याचं नातं नसून सिद्ध करण्याचं नातं आहे. मैत्रीसाठी कोणतेही बंधन आवश्यक नसतात कुठली वयोमर्यादाही नसते.
 
आपल्याला हवं ते करण्याची मुभा या नात्यात असते म्हणूनच मित्रमैत्रिणींपासून दूर गेल्यावर काहींच्या डोळ्यांत आपसुकच पाणी येतं. आपण मागे कधीतरी रडलेले दिवस आठवले की आता हसायला येतं आणि पूर्वी कधी मित्रांसोबत मनसोक्त हसलेले दिवस आता आठवले की आता रडायला येतं. मैत्रीत रुसवे-फुगवे असतात, कधी अबोला असतो मात्र एकमेकांविषयी तेवढीच काळजीही असते. या काळजीतूनच मैत्री अधिक खुलत जाते व जवळीक साधल्या जाते.
 
आयुष्याच्या पूवार्धात कधी डोकावून बघितले तर एक नक्की जाणवेल की परीक्षांमधून मिळालेल्या गुणांमुळे आपल्याला कायमचं सुख मिळतं असं नाही पण लेक्चर बंक करून मित्रांसोबत केलेल्या मस्तीची आठवण आली की नेहमीच आपसूकच डोळ्यातून आठवणीचे अश्रू ओघळतात. खरं सांगायचं तर मैत्री म्हणजे फक्त विश्वास आणि या विश्वासावर मैत्री अधिकाधिक दृढच होत राहते.
 
आयुष्याच्या प्रवासात अशा मित्र, मैत्रिणींची तर पावलोपावली व्यक्तीला मित्राची अथवा मैत्रीणीची गरज ही भासत असते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा ‘मैत्री दिन’ म्हणून साजरा करायलाच हवा.