खरंच मैैत्री आवश्यक आहे का?

    दिनांक :01-Aug-2019
मीनाक्षी वैद्य
 
मैत्री ही लहानपणापासूनच होत असते. अगदी नर्सरीत प्रवेश घेतला की सगळे जण आपआपल्या वयाच्या मुली-मुलांशी मैत्री करतात. मैत्री स्नेहाचा धागा आहे. या स्नेहाच्या धाग्यावरच आपण आपले पुढचे आयुष्य चढत असतो. कारण आपण शाळेत शिक त असतो, तेव्हा आपल्याला आपल्या मैत्रिणींच्या संपर्कात राहूनच बर्‍याचशा गोष्टीत अवगत होतात. त्यांंनी सांगितलेल्या कुठल्याही (चांगल्या) गोष्टींचे अनुकरण आपण आपण लवकर करतो. तीच गोष्ट आईने सांगितली, की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजेच काय आपल्या जीवनात मित्र-मैत्रीण असणे फार गरजेचे आहे. 
 
 
आजचे युग संपूर्णपणे बदलले आहे. आता तर बहुतांश घरी एकुलते एक अपत्य असते. आई-वडील दोघेही नोकरी करणारी असतात. आजी-आजोबा घरी असेल तर ठीक किंवा ते देखील आपल्या मुलांकडे सहजासहजी रहायला तयार नसतात. त्यांना देखील स्वातंत्र्य पाहिजे असल्याने ते स्वतंत्रपणे आपल्या स्वत:च्याच घरी राहणे पसंत करतात. अशा वेळी लहान वयात ही मुले शेजारच्या मुलांसोबत खेळतात आणि मोठी मुलं-मुली असतील तर ही मंडळी आपल्या मित्र-मैत्रणींच्या सहवासात राहतात. कारण या मुलांना देखील आपले विचार शेअर करायला कुणी तरी पाहिजे असते. अशा वेळी मित्र-मैित्रिणींशी त्यांची घट्ट मैत्री जमते. एकवेळेस ही मुले घरच्यांशी इतकी समरस होत नाही, तितकी आपल्या मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणे गप्पा मारतात. आपल्या मनातील चांगल्या-वाईट गोष्टींवर मनमुराद चर्चा करतात आणि त्या मित्र मंडळींचे विचार या मुलांना पटतात, कारण सततच्या सहवासामुळे ही मुले जास्त प्रमाणात मित्रांच्या कलेने ओढल्या जातात.
 
नोकरी करणार्‍या स्त्रियांना देखील ऑफिसमध्ये वयाने लहान असणार्‍या मुली असल्या तरी तिला आपण मैत्रिण म्हणूनच संबोधतो. त्यांची कम्प्युटर, मोबाईल, व्हॉट्‌सअॅप, फेसबुक यांच्याशी जास्त चांगली मैत्री झालेली असते आणि त्यांना या गोष्टी फार सफाईने हाताळता येतात. त्या मुलांकडून मैत्रीण या नात्याने शिकण्यासारखे बरेच असते.
 
गृहिणींना देखील भरपूर मैत्रिणी असतात. आजकाल तर कॉलनी-कॉलनीत मैत्रिणी मिळून कीर्तन, भजन, गाण्याचा क्लास तसेच ‘गेट टुगेदर’ चित्रपट पाहणे, अनेक सण-उत्सव एकत्र साजरे करणे, लग्नाचा मुहूर्त मैत्रिणींसोबत करणे अशा सगळ्याच गोष्टींचा आनंद या मैत्रीमधून मिळतं असून, त्यासोबत चांगल्या गोष्टी देखील घडून येतात. यातून एकमेकांचा विश्वास, प्रेम देखील जपल्या जात असतं. खर्‍या मैत्रिणी असतील तर त्यांनी आपल्या मैत्रिणीचे तिच्यात असलेले अवगुण देखील सांगितले पाहिजे, तेव्हाच तिच्यात खुरी सुधारणा होते. मैत्रीण म्हणून तिने सांगितलेल्या गोष्टीचे वाईट देखील वाटायला नको. तोंडावर तर स्तुती कुणीही करतं परंतु तिच्यात वाईट काय हे सांगतं नाही आणि ते सांगितल्याशिवाय त्यात सुधारणा होऊ शकत नाही. वेळ पडली तर सुख-दु:खात पाठिशी खंबीरपणे उभे राहून हक्काने न जमणारे काम करून घेणारी एकतरी मैत्रिण हवी.