घरातील सदस्यांना पाहून स्पर्धक झाले भावूक

    दिनांक :01-Aug-2019
बिग बॉस मराठीच्या घरात काल आगळा वेगळा टास्क रंगला. गेल्या दीड महिन्यांपासून सदस्य त्यांच्या घरापासून लांब आहेत. इतके दिवस आपल्या माणसांपासून लांब राहणं तसं अवघडच आहे. म्हणूनच बिग बॉसनं घरातील सदस्यांना एक सरप्राईज दिले. सदस्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भेटण्याची संधी देत त्यांची इच्छा पूर्ण केली.
 
 
 
बिग बॉसच्या घरात काल स्टॅच्यूचा खेळ रंगला. या टास्कमध्ये सदस्यांना बिग बॉसच्या घोषणेनंतर 'स्टॅच्यू' व्हायचंय; म्हणजेच आहे त्या पोझिशनमध्ये एका जागी पुतळ्यासारखं स्थिर थांबायचं. हे केव्हापर्यंत? तर बिग बॉस 'रिलीझ' ही सूचना देत नाहीत तोपर्यंत. बिग बॉसने 'रिलीझ' म्हटलं की सदस्य हालचाल करू शकत होते. पहिल्यांदा बिग बॉसनं घरातील सदस्यांना स्टॅच्यू केल्यानंतर किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी वीजनं घरात एन्ट्री घेतली. बॉबीला पाहताच स्टॅच्यूच्या अवस्थेत असणाऱ्या किशोरींना अश्रु अनावर झाले होते. बॉबीनं 'किशोरींना तू खुप छान खेळत आहेस. तू सुपरस्टार आहेस तुझ्यावर कोणी आवाज चढवला तर तू त्यांच्यावर आवाज चढवून बोल. तू कोणाचही ऐकून घेऊ नकोस. तू किशोरी शहाणे वीज आहेस. या घराबाहेर तू सुपरस्टार आहेस आणि इथं ही तू तशीच वाग' असा सल्ला दिला.' त्याचबरोबर घरातील इतर सदस्यांनाही त्यानं 'किशोरींसोबत चांगलं वागा, तिचा मान ठेवा. तुम्ही तिला सतत टार्गेट करताय हे पाहून खुप वाईट वाटतंय. असं सांगितलं.
नेहा, शिवानी आणि हिना यांसुद्धा त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भेटून भावूक झाल्या होत्या. नेहाला भेटण्यासाठी नेहाचा नवरा नचिकेत आला होता. तर, शिवानीला तिच्या वडिलांनी भेट देऊन आश्चर्याचा धक्का दिला. हिना पांचाळला भेटण्यासाठी तिची आई आली होती. घरातील इतर सदस्यांना कोण कोण भेटायला आले ? त्यांनी यांना काय सल्ले दिले ? हे लवकरच कळेल.