मैत्रीच्या नात्याला काळिमा ; मित्रांकडूनच तरुणीवर सामूहिक बलात्कार

    दिनांक :01-Aug-2019
नागपूर,
 
मैत्रीचे नाते हे निर्मळ, निरागस आणि विश्वासाच्या नात्यांपैकी एक आहे. या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घृणास्पद घटना नागपुरात उघडकीस आली आहे. मैत्रिणीच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन दोन नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना नागपुरात घडली. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करण्यापूर्वी या दोघांनी आपल्या मैत्रिणीला दारु पाजली आणि त्यानंतर नशेत असताना तिच्यावर बलात्कार केला.

 
नागपूरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणीच्या दोन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. निखिल सोमकुवर या तरुणासोबत तिची मैत्री होती. आरोपी निखिल पीडित तरुणीच्या मामाचाही मित्र होता. सुरुवातीला दोघांमध्ये असलेली सामान्य ओळख नंतर घट्ट मैत्रीत रूपांतरित झाली होती. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी तिच्या घरी एकटी असताना आरोपी निखिल सोमकुवर तिला घरी भेटायला गेला होता. त्यावेळी निखिलने पहिल्यांदा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. आठ दिवसांपूर्वी निखिलने त्याच्या वतन नावाच्या आणखी एका मित्रासोबत पुन्हा पीडित तरुणीचे घर गाठले. निखिल आणि वतन या दोघांनी पीडितेला मद्यपान करायला लावले आणि ती नशेत असताना आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. मैत्रीदिनाच्या अवघ्या तीन दिवसांआधी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.