अजनी पोलिस ठाण्याच्या बंदीगृहातून आरोपी पळाला

    दिनांक :01-Aug-2019
नागपूर,
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीने अजनी पोलिस ठाण्याच्या बंदीगृहातून पळ काढल्याची घटना उघडकीस आली. निखिल चैतराम नंदनकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडि मुलगी ही इव्हेंटचे काम करते. २ जून २०१९ रोजी दुपारी २ च्या सुमारास मैत्रिणीकडून कामाचे पैसे घेऊन येते असे सांगून ती घरून निघाली. त्यानंतर ती घरी आलीच नाही. १५ दिवस तिच्या आईने तिचा शोध घेतला परंतु, तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे १६ जून रोजी मुलीच्या आईने अजनी पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी ३६३ अन्वये गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास पाचपावलीचे प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक बोंडे यांच्याकडे दिला होता. उपनिरीक्षक बोंडे यांनी तपास केला असता आरोपी निखिल नंदनकरने तिला पळवून नेल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. मात्र, निखिल पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पोलिस त्याच्या मागावरच होते. पोलिसांनी मुलीची विचारपूस केली असता निखिलने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. त्यावरून ३७६ आणि पोक्सो अन्वये कलम वाढविण्यात आले.
 
बुधवारी दुपारी निखिल आपल्या घरी आला होता. ही माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी भांडेवाडी येथील त्याच्या घरून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला सायंकाळी ६.३० च्या सुमारास अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला टक करून बंदीगृहात (लॉकअप रूम) डांबले. बंदिगृहाजवळ ड्युटी असलेली महिला शिपाई वनीता जुनघरे हिने त्याला बंदीगृहात डांबल्यानंतर बंदीगृह कुलूपबंद केले. मात्र, बंदीगृहाचे दार जाम झाल्याने दाराची कडी निट लागली नाही. त्यामुळे बाहेरून बंदीगृह कुलूपबंद असल्याचे दिसून येत असले तरी दार केवळ लोटले होते. दरम्यान, वनीता कुठेतरी निघून गेली. या संधीचा फायदा घेत निखिलने दार उघडून पोलिस ठाण्याच्या मागील दाराने पळ काढला. रात्री ८.४५ च्या सुमारास वनीता बंदीगृहाजवळ आली असता तिला बंदीगृहात निखिल दिसला नाही. बंदीगृहातून आरोपी पळून गेल्याचे समजताच पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्याला पकडण्यासाठी पोलिस पथके पाठविण्यात आली. मात्र, निखिल पोलिसांना सापडला नाही. याप्रकरणी अजनी पोलिसांनी २२४ कलमान्वये गुन्हा नोंदवून निखिलचा शोध सुरू केला आहे.